सातारा : सलग तीन दिवस झालेल्या वळवाच्या पावसानंतर सातारा शहरासह जिल्ह्याच्या तापमानात पुन्हा वाढ झाली आहे. हवामान विभागाने गुरुवारी सातारा शहराचे कमाल तापमान ३१.१, तर किमान तापमान २१.१ अंश सेल्सिअस इतके नोंदविले आहे. वातावरणात सतत बदल होत असताना महाबळेश्वर तालुक्याचा पाराही हळूहळू वाढू लागला आहे. मंगळवारी येथील कमाल तापमान २०.२ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले.
नियमांचे उल्लंघन
सातारा : संचारबंदी असतानाही साताऱ्यातील बाजारपेठेत नागरिक खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. मास्कचा वापर करा, सोशल डिस्टन्सचे पालन करा असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार केले जात आहे; परंतु नागरिकांकडून या नियमांची पायमल्ली केली जात असून, फिजिकल डिस्टन्सचा फज्जा उडत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पालिकेने कारवाई करणे गरजेचे आहे.
दुरुस्तीची मागणी
सातारा : शहरातील राजवाडा ते बोगदा या रस्त्यावर ठिकठिकाणी लहान-मोठे खड्डे पडले असून, खड्ड्यांमुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. या रस्त्यावरून ये-जा करताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या रस्त्याची तातडीने डागडुजी करावी, अशी मागणी वाहनधारकांसह नागरिकांमधून होत आहे.
संरक्षक कठडे गायब
पेट्री : सातारा-कास मार्गावर असलेल्या यवतेश्वर घाटातील संरक्षक कठड्यांची दुरवस्था झाली आहे. वाहनधारक व नागरिकांनी कठड्यांची दुरुस्ती करण्याची मागणी अनेकदा केली आहे. मात्र, बांधकाम विभागाकडून अद्यापही कोणतीच दखल घेण्यात आली नाही. पावसाळा सुरू होण्यापूर्वी घाटातील संरक्षक कठड्यांची तातडीने डागडुजी करावी, अशी मागणी केली जात आहे.
कुत्र्यांचा उपद्रव
सातारा : सातारा शहरासह उपनगरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांनी उपद्रव घातला असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ही कुत्री ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांच्या, तसेच वाहनधारकांच्या अंगावर धावून जात आहेत. पालिकेने भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
ओढ्यांची स्वच्छता
सातारा : सलग तीन दिवस झालेल्या वळवाच्या पावसामुळे शहरातील ओढे व नाले कचऱ्याने तुडुंब भरले आहे. डोंगर उतारावरून वाहन आलेल्या कचऱ्यामुळे नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. सातारा पालिकेच्या आरोग्य विभागाने गुरुवारपासून ओढे, नाले स्वच्छतेचे काम हाती घेतले आहे. माची पेठ, केसरकर पेठ येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
गतिरोधक बेकायदा नव्हे
सातारा : वर्ये ते किडगाव या मार्गावर असलेला गतिरोधक ग्रामस्थांनी बांधला असून, तो योग्यच आहे. या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनांच्या वेगावर मर्यादा आणण्यासाठीच गतिरोधक उभारण्यात आला आहे. असे असताना हा गतिरोधक चुकीचा असल्याचे सांगितले जात आहे. गतिरोधकामुळे अपघात टळण्यास मदत होत असल्याचे नेले ग्रामस्थांनी निवेदनात नमूद केले आहे. निवेदनाची प्रत जिल्हा परिषद बांधकाम विभागा यांना देण्यात आली आहे.
(फोटो : २० जावेद खान)
आंब्यांचे दर उतरले
सातारा : साताऱ्यातील जिल्हा परिषद मैदानावर भरणाऱ्या आडत बाजारात गुरुवारी आंब्यांची मोठ्या प्रमाणात आवक झाली. वळवाच्या पावसाचा आंब्याच्या दरावर परिणाम झाला असून, काही दिवसांपूर्वी पाचशे ते सहाशे रुपये डझन या दराने मिळणार आंबा आता दोनशे ते तीनशे रुपये डझन या दराने विकला गेला. बऱ्याच प्रतीक्षेनंतर आंब्यांचे दर उतरल्याने ग्राहकांमधून आंब्याला मागणी वाढली आहे.