सातारा : जिल्ह्यात एप्रिलच्या सुरुवातीलाच उन्हाच्या असह्य झळा सोसण्याची वेळ नागरिकांवर आली असून मागील १५ दिवसांत तर सातारा शहराचा पारा तब्बल नऊवेळा ३९ तर पाचवेळा ३८ अंशावर पोहोचला आहे. यावरुनच जिल्ह्यातील उन्हाची तीव्रता लक्षात येत आहे. तर मे महिना जिल्हा तापवणार अशीच स्थिती आहे.जिल्ह्यात गेल्या एक वर्षाचा विचार करता पावसाळा आणि हिवाळी ऋतुची तीव्रता जाणवलीच नाही. कारण, वार्षिक सरासरीच्या ७० टक्क्यांहून अधिक पाऊस पडला. यामुळे जिल्ह्यात दुष्काळी स्थिती उद्भवली. तर हिवाळ्यात कडाक्याच्या थंडीशी लोकांचा सामना झालाच नाही. सातारा शहराचे किमान तापमान ११ अंशापर्यंत खाली आलेले. तर थंड हवेच्या महाबळेश्वरचा पाराही १० अंशाच्यावरच कायम राहिला. पण, उन्हाळ्याने साताराकरांना घाम फोडला आहे.
मार्च महिना सुरू झाल्यापासून जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढत गेली. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तर कमाल तापमान ४० अंशापर्यंत पोहोचले होते. सातारा शहराचा पारा तर ३९ अंशावर गेला होता. यामुळे एप्रिल आणि मे महिन्यात उन्हाळा असह्य होणार असे चित्र होते. अशीच अनुभूती सध्या येत आहे. कारण, गेल्या १५ दिवसांत सातारा शहराचा पारा बहुतांशीवेळा ३९ अंशावरच राहिला आहे. २७ मार्च ते १० एप्रिलचा विचार करता ९ वेळा पारा ३९ ते ४० अंशादरम्यान होता. यामध्ये एकवेळ कमाल तापमान ३९.८ अंशापर्यंत पोहोचले होते. तसेच ५ वेळा कमाल तापमान ३८ ते ३९ अंशादरम्यान होते. तर फक्त एकदाच पारा ३७ अंशावर होता. यावरुनच जिल्ह्यातील उन्हाळ्याची तीव्रता स्पष्ट होत आहे.दरम्यान, सातारा शहरातील पारा ३९ अंशावर कायम असलातरी पूर्व दुष्काळी भागात उन्हाची तीव्रता अधिक राहते. माण, खटाव, फलटण तालुक्यातील तापमानाने यावर्षी ४० अंशाचा टप्पाही पार केला आहे. यामुळे दुष्काळी भागातील शेती तसेच मजुरीच्या कामावर परिणाम झालेला आहे.
सातारा शहरातील कमाल तापमान असे :दि. २७ मार्च ३९.१, २८ मार्च ३८.५, २९ मार्च ३८.७, ३० मार्च ३८.६, ३१ मार्च ३७.७, दि. १ एप्रिल ३९, २ एप्रिल ३९.२, ३ एप्रिल ३९.२, ४ एप्रिल ३९.८, ५ एप्रिल ३९.७, दि. ६ एप्रिल ३९.७, ७ एप्रिल ३८.८, ८ एप्रिल ३८.७, ९ एप्रिल ३९.२ आणि १० एप्रिल ३९.१