पुसेगाव : बुधचे तलाठी किशोर घनवट यांनी पहाटे पाचच्यासुमारास बुध येथील गाव ओढ्यात वाळूची तस्करी करणाऱ्या दोन ट्रॅक्टरला पकडले. हे दोन्ही ट्रॅक्टर पुसेगाव पोलीस ठाण्यात लावण्यात आले आहेत. अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या किशोर कांतिलाल जाधव व संदीप लक्ष्मण जाधव (रा. बुध, ता. खटाव) यांच्याविरुद्ध महसूल प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे.
खटाव तालुका उत्तर भागातील येरळा नदी व गावातील ओढ्याच्या पात्रात वाळूसाठा आहे. पण पात्रातील वाळू साठ्याचा अधिकृत लिलाव झालेला नाही. असे असतानाही या भागातून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा होत असल्याची माहिती महसूल प्रशासनाला मिळाली. त्यानंतर प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी, प्रांताधिकारी जनार्दन कासार, तहसीलदार किरण जमदाडे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध वाळू तस्करी रोखण्यासाठी पहाटे पाचच्यासुमारास तलाठी घनवट हे आपल्या सहकाऱ्यांसोबत गेले असता, त्यांनी ही कारवाई बुध येथे केली. किशोर जाधव याचा लाल रंगाचा विनानंबरचा ट्रॅक्टर असून, त्यामध्ये अंदाजे पाऊण ब्रास वाळू आहे, तर संदीप लक्ष्मण जाधव याचा लाल रंगाचा, विनानंबरचा ट्रॅक्टर बुध येथील ओढ्यात अनधिकृतपणे वाळू उत्खनन करून ट्रॉलीत वाळू भरत असताना ओढ्याच्या पात्रात पकडला. परंतु पकडत असताना ट्रॅक्टरचालकाने ट्रॉली डंपिंग करून ट्रॉलीमधील वाळू खाली ओतली. त्यामुळे हा ट्रॅक्टर शिताफीने पकडून पुसेगाव पोलीस स्टेशनला जमा केला. महसूल प्रशासनाने केलेल्या या कारवाईचे परिसरात कौतुक होत असून, वाळूतस्करांविरुद्ध कठोर पाऊले उचलण्याची मागणी नागरिक करत आहेत.
चौकट
तीन वर्षांत एकही कारवाई नाही
बुधचे मंडल अधिकारी यांच्या तीन वर्षांच्या कारकीर्दीत ललगुण येथे प्रांताधिकाऱ्यांनी तीन ट्रॅक्टरवर कारवाई केली. एक आठवड्यापूर्वी बुधचे तलाठी यांनी दोन ट्रॅक्टरवर कारवाई केली. तसेच राजापूर तलाठी यांनीही कारवाई केलेली आहे. परंतु मंडल अधिकाऱ्यांना एकही कारवाई करता आलेली नाही, असे बोलले जात आहे. मंडलाधिकारी कार्यालयात बुध येथे वाळूमाफिया पडून असल्याचे चित्र आहे. अद्याप एकही कारवाई न केलेले मंडल अधिकारी यांच्या कार्यालयात वाळूमाफियांचा ठिय्या असण्याचे कारण काय आहे, हे मात्र गुलदस्त्यात आहे.