बाळासाहेब रोडे - सणबूर--जिल्ह्यामध्ये जलयुक्त शिवार अभियानातून शिवारात पडलेल्या पावसाचा थेंबन्थेंब अडविण्यासाठी विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. सामान्यांचाही या अभियानातील सहभाग मोलाचा ठरत आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेत आपलाही सहभाग असावा, या हेतूने श्रीधर हावळे यांनी लग्नपत्रिकेच्या माध्यमातून जलयुक्त शिवार योजनेत सहभागी होण्यासाठी आवाहन केले आहे. ही अनोखी लग्नपत्रिका सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.जलयुक्त शिवार अभियानाच्या जनजागृतीसाठी जिल्हाधिकारी मुदगल यांनी जलदिंडीचे नियोजन केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील २१५ गावांमध्ये आगामी काळात पाणीच पिकणार आहे. या २१५ गावांमध्ये ३५८ कामे सुरू असून ८५७ कामे पूर्ण झाली आहेत. जिल्ह्यात या अभियानाची प्रभाविपणे अंमलबजावणी सुरू आहे. पाटण तालुक्यातील मानेगाव या गावातील आनंदराव शिवराम हावळे यांचे चिरंजीव श्रीधर हावळे आणि आनंदराव लक्ष्मण टोळे यांची कन्या योगिता यांचा विवाह होत आहे. त्या शुभविवाहाच्या निमित्ताने मित्रमंडळी, नातेवाइक व अन्य हितचिंतकांना देण्यात आलेल्या पत्रिकेमधून जलयुक्त शिवार अभियानाचा संदेश देण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यामध्ये सध्या जलयुक्त शिवार अभियान या योजनेने भरारी घेतली आहे. ‘सृष्टीसाठी जीव सारा, तिळ-तिळ तुटावा, गोड पाण्याचा झरा, माणूस माणसाला जोडला जावा..!’ अशा आशयाच्या कवितेच्या ओळी पत्रिकेत छापल्या आहेत. सोबत दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर, जलयुक्त शिवार अभियानाचा लोगो, समवेत महाराष्ट्राचा नकाशाही छापला आहे.हावळे परिवाराने लग्नपत्रिकेतून पै पाहुणे, मित्रमंडळी, नातेवाइक यांना जलयुक्त शिवार योजनेत सहभागी होण्याचा संदेश दिला आहे. गावागावांत जलक्रांती होण्यास मदतजिल्हा टंचाईमुक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी अश्विनी मुदगल यांनी चंग बांधला आहे. जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्यासह त्यांची सर्व टीम मोठ्या उत्साहाने या कामाला लागली आहे. त्याचे सकारात्मक परिणाम जिल्ह्यात दिसू लागले आहेत. जाखणगाव, गुळुंब, किवळसारखी गावे जिल्ह्यात रोलमॉडेल बनली आहेत तर अंतर्गत कामे पूर्ण झाल्यास गावात जलक्रांती होण्यास मदत होणार आहे.
लग्नपत्रिकेतून ‘जलयुक्त शिवार’चा संदेश
By admin | Published: May 28, 2015 10:06 PM