आॅनलाईन लोकमततरडगाव (जि. सातारा), दि. १६ : काळज, ता. फलटण येथील बारामती इंग्लिश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थ्यांनी दिंडी काढली. त्याचबरोबर परतीच्या प्रवासाला निघालेल्या श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी विसावाच्या ठिकाणी जावून पादुकांचे दर्शन घेत संतांची शिकवण दिंडीच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला. पंढरपूरहून आळंदीकडे निघालेली पालखी काळज येथील दत्त मंदिर येथे काही क्षण भाविकांना दर्शन घेता यावे म्हणून थांबली होती. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी पांढरेशुभ्र कपडे परिधान करून हातात टाळमृदुंग व भगव्या पताका घेत माउलींचा जयघोष करीत शाळेपासून पालखी विसाव्यापर्यंत दिंडी काढली. या दिंडीमध्ये विठ्ठल-रुक्मिणी यांच्यासह वारकऱ्यांच्या वेशभुषेत विद्यार्थी सहभागी झाले होते. शाळांमधून मिळणाऱ्या शिक्षणातून विद्यार्थ्यांना इतिहास, अर्थशास्त्र, गणिती सिद्धांत तसेच विज्ञान तंत्रज्ञान या विषयीचे ज्ञान आत्मसात होते. मात्र, अध्यात्म हे आवडीने त्या क्षेत्रात गेल्याशिवाय उमजत नाही. असाच काहीसा संदेश या चिमुकल्यांनी भक्तिमय वातावरणात दिंडी काढून दिला.दिंडीसाठी विद्यार्थ्यांना शिक्षक व कर्मचाऱ्यांनी प्रेरणा दिली. तसेच सर्वजण दिंडीत सहभागी झाले होते.
बाल वारकऱ्यांकडून संतांच्या शिकवणुकीचा संदेश
By admin | Published: July 17, 2017 3:17 PM