स्वप्नील शिंदे ।सातारा : पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांनी लोकसहभागातून मोठ्या प्रमाणात जलसंधारणांची कामे केली. त्यामुळे मान्सूनच्या पहिल्याच पावसात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. हाच जलक्रांतीचा संदेश सायकलीवर जलज्योतीच्या माध्यमातून राज्यभर पोहोचविण्याचा विडा खटाव तालुक्यातील गोपूजच्या अतुल पवार व सुशांत गुरव या दोन जलदुतांनी घेतला आहे.
दुष्काळी खटाव तालुक्यातील गोपूज गावच्या राहणारे अतुल पवार व सुशांत गुरव हे दोघे जीवलग मित्र. त्या दोघांना लहानपणापासूनच सायकलस्वारीच्या प्रवासाचे वेड होते. रुळलेल्या वाटांपेक्षा काहीतरी वेगळे करण्याचा त्यांचा मानस होता. दरम्यान, त्यांना मुंबईत होणाऱ्या मॅरेथॉनची माहिती मिळाली. ५ जानेवारीला रात्री दोन वाजता उठून त्यांनी सायकलला टांग मारली, ते तब्बल १७ तासांत ३०० किलोमीटरचा प्रवास करत मुंबईला पोहोचल्यानंतरच सायकलीवरून खाली उतरले. त्या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले आणि अव्वल आले.
तेवढ्यावरच हे दोन सायकलस्वार थांबले नाहीत. दरम्यान, अभिनेता आमीर खानच्या पाणी फाउंडेशनच्या वतीने वॉटर कप स्पर्धेत गावाने सहभाग घेतला होता. यात या दोघांनी पुढाकार घेत श्रमदान करून जलसंधारणाची कामे केली. दरम्यान, त्यांना पाणी आणि जलसंधारणचे महत्त्व कळाल्याने जलसंधारणाचा संदेश राज्यभर पोहोचविण्यासाठी त्यांनी १७ फेब्रुवारीचा ‘गोपूज-राळेगणसिद्धी-हिवरेबाजार’ हा नवीन सायकल दौरा सुरू झाला. सायकलवर ४८ तास प्रवास करीत ५०० किलोमीटर अंतराचा हा प्रवास केवळ सायकलिंग न करता जलज्योतीच्या माध्यमातून सामाजिक संदेश यात्रा सुरू केली.
दुष्काळी गावांचे प्रेरणास्थान असलेल्या राळेगणसिद्धी-हिवरेबाजार या दोन पाणीदार गावांचा जलसंधारणाचा पॅटर्न सायकल यात्रेद्वारे पोहोचविण्यासाठी अतुल पवार व सुशांत गुरव या युवकांचा प्रयत्न सुरू आहे.जलसंधारणानंतर वृक्षारोपणजलसंधारणाच्या कामानंतर आता वृक्षरोपण ही मोहीम हाती घेतली आहे. सध्या गावात दहा हजार रोपे आहेत. त्यांची गाव परिसरात लागवड करून त्यांचे सवंर्धन करण्याचे मोठे आव्हान आहे. ते ग्रामस्थांच्या मदतीने आगामी १५ दिवसांत वृक्षारोपण करणार आहेत.
राळेगणसिद्धी व हिवरेबाजार हे जलसंधारणाच्या कामांचे आदर्श मॉडेल आहे. ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा मानस आहे. सायकलीवर प्रवास करत लोकांना जलक्रांतीच्या चळवळीत सहभागी करून घेत आहोत.- अतुल पवारपाणी फाउंडेशनच्या वतीने जलसंधारणाचे महत्त्व अनेक गावांना कळाले. अनेकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग केला. त्यामुळे जलसंधारणाची कामे झाली. इतर गावांनी त्याचप्रमाणे काम केले तर महाराष्ट्र दुष्काळमुक्त होण्यास वेळ लागणार नाही.- सुशांत गुरव