सातारा : जिल्हा पोलीस दलाअंतर्गत निर्भया पोलीस पथकाच्यावतीने शनिवारी रात्री अकरा वाजता साताऱ्यातील सुमारे दोन हजार युवती व महिलांनी वॉकथॉन उपक्रमामध्ये सहभाग घेऊन महिलांनी निर्भय बनण्याचा संदेश दिला. राजवाड्यापासून नगरपालिका आणि परत राजवाड्यापर्यंत महिला व युवतींनी पायी चालत महिलांनी निर्भय बनण्यासाठी जनजागृती केली.देशासह राज्यातील युवती व महिलांनी निर्भय बनावे, हा संदेश देण्यासाठी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी त्यांच्या संकल्पनेतून साताऱ्यात पहिल्यांदाच आगळ्या वेगळ्या या वॉकथॉन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या दोन दिवसांपासून या उपक्रमाची तयारी सुरू होती. महाविद्यालयीन युवतींपासून ते महिला बचत गटांतील महिलांना यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील सुमारे दोन हजार महिला आणि युवतींनी या उपक्रमात सहभाग घेतला.राजवाडा येथील गांधी मैदानावर शनिवारी रात्री अकरा वाजता सर्व महिला व युवती एकत्र जमल्या. उपस्थित महिला व युवतींना अधीक्षक सातपुते यांनी निर्भय बनण्याची शपथ देऊन संवाद साधला. रात्री सव्वाअकरा वाजता उपक्रमाला सुरुवात झाल्यानंतर खालच्या रस्त्याने महिला चालत पोलीस मुख्यालयामार्गे निघाल्या. त्यांच्यासोबत महिला पोलीस कर्मचारीही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
सातारा शहर पोलीस ठाण्याच्या लॉकअप रस्त्यावरून नगरपालिका. तेथून राजपथावरून राजवाड्याकडे महिला चालत गेल्या. काही महिला पहिल्यांदाच या उपक्रमाच्या निमित्ताने रात्री अकरा वाजता घराबाहेर पडल्या होत्या. अशा महिलांनी या उपक्रमाचे कौतुक केले. रात्री साडेबाराच्या सुमारास या उपक्रमाची सांगता झाली.अलीकडे समाजामध्ये महिलांवर अत्याचार आणि छेडछाडीचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे महिलांनी निर्भय बनणे आवश्यक आहे. यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे जिल्हा पोलीस दलाकडून सांगण्यात आले.