मायणी (सातारा) : घरगुती व औद्योगिक ग्राहकांसाठी देण्यात आलेल्या मीटरमध्ये सतत बिघाड होत असल्यामुळे येणारे लाईट बिल कित्येक पटीने अधिक येत आहे. त्यामुळे ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारपूस केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देत आहेत.मायणी परिसरात वीज वितरण कंपनीचे हजार वीजग्राहक आहेत. या ग्राहकांना त्या कंपनीमार्फ त घरगुती व औद्योगिक वापरासाठीचा वीज पुरवठा केला जातो. ग्राहकांनी वापरलेल्या बिलाचे लाईटबिल प्रती महिना येत असते ते भरणे ग्राहकाला बंधनकारक आहे. मुदतीपेक्षा उशीर झाल्यानंतर ग्राहकांकडून दंडापोटी ठराविक रक्कम आकारली जाते. तसेच या ग्राहकांची वीज कनेक्शन व इतर तक्रारींचे निवारण करण्याचे कामही याच कंपनीचे असते.
मात्र असे असतानाही ही कंपनी ग्राहकांना सेवा देण्यात या कंपनीचे अधिकारी, पदाधिकारी, कामगार टाळाटाळ करतात. कंपनीमार्फ त देण्यात आलेले वीज आकारणीचे मीटर हे हलक्या प्रतीचे असल्यामुळे या मीटरमध्ये वारंवार बिघाड होतो.
अशा बिघाडाची तक्रार देण्यासाठी ग्राहक गेल्यानंतर मीटर शिल्लक नाहीत, तीन-चार महिने थांबावे लागेल, मीटरची तपासणी करावी लागेल, मीटर काढून आणा अशी उत्तरे दिली जातात. त्याच मीटर तपासणीसाठी ग्राहकाला मीटर घेऊन वडूजला जावे लागते. त्या ठिकाणी असलेले अधिकारी अशीच काही तरी उडवाउडवीची उत्तरे देऊन ग्राहकांना त्रास देत असतात.
यापूर्वी हेच ग्राहक साधा मीटर, साठ-शंभर होल्टेजचे साधे बल्ब व ट्यूबलाईट वापरत होते. त्या वेळी असणाऱ्या महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाकडून प्रती तीन महिन्याला वीज आकारणी करत असतानाही लोकांना शंभर रुपये, दोनशे रुपयेच्या आता लाईट बिल येत होते.
आज मात्र प्रत्येक घरामध्ये एलईडी, सीएफएल हे कमी वीज वापरणारे बल्ब असतानाही या कंपनीकडून प्रती महिना बिल हे तीनशे ते तीनशेहून अधिक येत आहे. त्यामुळे नक्की कोणता घोटाळा होत आहे? हे मात्र कळण्यास मार्ग नाही.
प्रती महिन्यात देण्यात येणाऱ्या लाईट बिलांमध्ये ग्राहकांच्या मीटरचा फोटो नसतो. असला तरीही चुकीचा असतो. यासह चुका नित्याच्याच बनलेल्या असतानाही संबंधित अधिकारी या गोष्टींकडे कानाडोळा करीत आहेत. त्यामुळे ग्राहकांना आर्थिक व मानसिक त्रास होतो. त्यामुळे वीज वितरण कंपनी नक्की कोणाच्या फायद्यासाठी व सेवेसाठी आहे, हेच कळायला मार्ग नाही. आर्थिक व मानसिक संकटात सामान्य माणूस मात्र भरडला जात आहे.चुकीचे रिपोर्ट व आर्थिक फटकामहिन्याचे हजार-दोन हजार रुपये बिल आल्यानंतर अधिकाऱ्यांशी संपर्क केल्यानंतर ते मीटर तपासून घेण्याचा सल्ला देतात. मात्र, दुरुस्ती विभागाकडून मीटरमध्ये काही दोष नाही, असा दाखला देण्यात येतो. त्यानंतर लगेच पूर्ण रक्कम वसूल केली जाते. म्हणजे वाढीव बिलाचा ग्राहकांना आर्थिक फटका बसत आहे.दुरुस्तीपेक्षा प्रवासाचा खर्च अधिकमीटरमध्ये बिघाड झाल्यानंतर तो मीटर वडूज या ठिकाणी जावे लागते. मायणी, कलेढोण परिसरांतून एक वेळा जाण्याचा खर्च १०० रुपये येतोे. किमान दोन ते तीनवेळा जावे लागते. या ठिकाणी १५० रुपयांचे चलन घ्यावे लागते. त्यामुळे हे दुरुस्तीचे दुसरे केंद्र मायणीत व्हावे.