सातारा - मुंबई येथे म्हाडा प्रकल्पांमध्ये अधिकारी असल्याचे व लोकांना फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून तब्बल 99 लाख 84 हजारांची फसवणूक करून गायब झालेल्या म्हाडाच्या तोतया अधिकाऱ्याला सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरणच्या कर्मचाऱ्यांनी अटक केली. अरूण गणपत शिंदे (वय ५२, रा. मानगाव, जि. रायगड, सध्या रा. मिरारोड मुंबई) असे अटक करण्यात आलेल्या सरार्इत आरोपीचे नाव आहे.
यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंर्बइ येथे म्हाडा प्रकल्पांतर्गत प्लॅट देण्याचे सांगून 99 लाख 84 हजारांची फसवणूक करून गेल्या तीन वर्षांपासून अरूण शिंदे हा फरार होता. त्याच्यावर मुंबई येथील मिरारोड आणि जोगेश्वरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. एवढेच नव्हे तर वेगवेगळ्या फसवणुकीचे आणि चेक बाउन्सचे गुन्हेसुद्धा त्याच्यावर दाखल आहेत.
दरम्यान, पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांना अरूण शिंदे हा सातारा शहरात येणार असल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी गुन्हे प्रकटीकरणच्या टीमला तत्काळ त्याला पकडण्याच्या सूचना दिला. अरूण शिंदे हा गोडोली परिसरामध्ये आला असता त्याला पोलिसांनी शिताफिने पकडले. मुंबई पोलिसांना तीन वर्षांपासून गुंगारा देणारा अरूण शिंदेला पकडल्यानंतर मिरारोड पोलिसांना याची माहिती देण्यात आली. त्याला नेण्यासाठी मुंबइहून एक टीम साताऱ्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर, पोलीस निरीक्षक वंदना श्रीसुंदर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समीर कदम, पोलीस नाइक सुजित भोसले, अविनाश चव्हाण, ज्योतीराम पवार, अभय साबळे, गणेश घाडगे, संतोष कचरे आदींनी या कारवाईत भाग घेतला.