म्हसवड : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत माण तालुक्यात म्हसवड येथेच कोरोनाबाधितांची सर्वाधिक संख्या झाल्यामुळे या कोरोनाची साखळी तोडण्यासाठी रविवारपासून (दि. १८) ‘जनता कर्फ्यू’चा निर्णय प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील व्यापारी व व्यावसायिकांच्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला.
यावेळी माण तालुका आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण कोडलकर, मुख्याधिकारी डॉ. सचिन माने, नगराध्यक्ष भगतसिंग वीरकर, पालिका उपाध्यक्ष दीपक बनगर उपस्थित होते.
प्रांताधिकारी सूर्यवंशी म्हणाले, ‘गेल्या चार-पाच दिवसांपासून म्हसवड शहरात कोरोनाबाधितांची वाढतच चाललेली संख्या ही बाब नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने चिंताजनक आहे.
शहरातील प्रत्येक भागातच कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. माण तालुक्यात सर्वाधिक संख्येने म्हणजे एक हजार ५५ रुग्ण आज, कालअखेर बाधित झाले असून, त्यापैकी ८२८ रुग्ण उपचारानंतर बरे झाले असले, तरीही सध्या १९८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत व मृतांची संख्या २९ झाली आहे. कोराेनाची साखळी तोडण्यासाठी येथील नागरिकांसह व्यापारी व व्यावसायिकांनी स्वयंफूर्तीने जनता कर्फ्यूचा निर्णय घेतला आहे. यासाठी संपूर्ण म्हसवड कंटेन्मेंट झोन म्हणून रविवारी सकाळ जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत.
म्हसवड शहरातील मेडिकल दुकाने व रुग्णालये याव्यक्तिरिक्त सर्व दुकाने बंद राहतील. नागरिकांना किराणा व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा घरपोच करण्यासाठी व्यवस्था पालिका व व्यापारी यांनी समन्वयातून करावी, घराच्या बाहेर नागरिकांनी पडू नये, शहरास जोडले गेलेले सर्व रस्ते बंद करावेत. जे नागरिक बाधित झाले आहेत व ते होम क्वारंटाईन झालेले आहेत, त्या परिसरात पालिकेने जंतुनाशकाची फवारणी करण्याची मागणी या बैठकीतील व्यापाऱ्यांनी केली.