म्हसवड , दि. १४ : येथील जिल्हा परिषदेची तीन क्रमांकाची शाळा ही शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर आहे. येथील शैक्षणिक कार्यास हातभार लागावा म्हणून नगर वाचनालयाने विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके वाचण्यास देऊन त्यांच्या ज्ञानात भर घालण्याचा निर्धार केला आहे. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी वाचनालयाने ही शाळा दत्तकच घेतली आहे.
शालेय जीवनातच विद्यार्थ्यांत वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी येथील मोफत नगरवाचनालयाने जिल्हा परिषद शाळा क्रमांक तीन दत्तक घेतली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना वाचनालयातून पुस्तके वाचण्यासाठी मिळणार आहेत.
ही पुस्तके विनामुल्य असणार आहेत. परिणामी विद्यार्थ्यांना ज्ञान मिळण्यास मदत होणार आहे. तसेच भविष्यातील वाटचालीच्यादृष्टीनेही पुस्तकातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग विद्यार्थ्यांना होणार आहे. त्यासाठीच हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांनी दत्तक वाचक योजनेचा लाभ घेऊन भविष्यातील स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी भक्कम पाया तयार करावा, असे आवाहनही वाचनालयाचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष नितीन दोशी यांनी केले आहे.