म्हसवड : म्हसवड पालिकेच्या वतीने पालिका हद्दीतील घरपट्टी व थकबाकीदारांचे पाणीपट्टी व थकबाकीदारांच्या वसुली मोहीम तीव्र केली असून, पालिकेने वीस टक्के उद्दिष्ट ठेवून रविवारअखेर ऐंशी टक्के वसूलही केली आहे. या वसुलीसाठी पालिकेने थकबाकीदारांच्या नावांची यादी शहरातील प्रमुख तीन ठिकाणी लावल्याने थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत. पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी भोरे-पाटील यांच्या कल्पकतेमुळे यंदा सर्वाधिक उच्चांकी वसुली होत असल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे. दोन महिन्यांपासून पालिकेच्या वसुली विभागाने घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीची मोहीम हाती घेतली आहे. मार्च महिन्यात वसुली मोहिमेची तीव्रता वाढवून ऐंशी टक्के वसुली पूर्ण केली आहे. थकबाकीदारांकडून थकित रक्कम वसूल करण्यासाठी पालिकेकडून थकबाकीदारांना जप्तीच्या नोटिसा, न्यायालयात थकबाकीदारांना खेचले होते. त्यानंतर नळकनेक्शन बंद केली. तसेच शहरात असणारा जीटीएल मोबाईल टॉवरही पालिकेने सील केला आहे. जिल्हा परिषद शाळा व शासकीय धान्य कोठार यांची घरपट्टी मोठ्या प्रमाणात असल्याने वसुलीस अडचणी येत आहेत. सध्या पालिकेने १८ नळकनेक्शन तोडली आहेत, तर यंदा प्रथमच कर थकवणारांच्या नावांच्या यादीचे डिजिटल फलक शहरातील मुख्य ठिकाणी लावल्याने कर थकवणाऱ्यांनी काही प्रमाणात नावे पाहून थकित कर रक्कम भरली आहे. या अनोख्या फंड्यामुळे वर्षानुवर्षे थकित असणाऱ्या लोकांनी वसुली भरल्याने पालिका वर्तुळात समाधानाचे वातावरण आहे. (प्रतिनिधी) मुख्याधिकारी पल्लवी भोरे-पाटील वर्षानुवर्षे पालिकेची कर थकित ठेवणाऱ्यांची नावे डिजिटल फलकावर आल्यामुळे कर वसुलीचे प्रमाण वाढले असून, आम्ही नव्वद टक्के कर वसुलीचे उद्दिष्ट ठेवले असून, ते पूर्ण करण्यासाठी पालिकेचे कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. ते उद्दिष्ट आम्ही निश्चित पूर्ण करू, असा विश्वास व्यक्त केला.
म्हसवड पालिकेची वसुलीत गांधीगिरी
By admin | Published: March 30, 2015 9:51 PM