म्हसवड : म्हसवड पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे म्हसवडकर नागरिक पिण्याचे क्षारयुक्त पाणी पित आहेत. क्षारयुक्त पाण्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य बिघडले असून, पालिका नागरिकांना पिण्यासाठी नेमके कुठले पाणी सोडते? पालिकेचा फिल्टर पाॅईंट असूनही नागरिकांना बिगरफिल्टर क्षारयुक्त पाणी गेल्या अनेक महिन्यांपासून सोडले जातेय. मग, फिल्टरचे पाणी नेमके कुठे मुरतेय ? आधीच कोरोनाच्या भीतीच्या सावटाखाली नागरिक आहेत. त्यात पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे क्षारयुक्त पाण्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
म्हसवड पालिका सत्ताधारी मंडळींच्या दुर्लक्षामुळे शहरातील व पालिका हद्दीतील नागरिकांना, सर्व फिल्टरची यंत्रणा असूनही बिगरफिल्टरचे पाणी पालिका गत अनेक महिन्यांपासून देत असल्याने नागरिकांना उलट्या, जुलाब मुतखडा असे पोटाचे अनेक आजार होऊ लागले आहेत. याकडे पालिका प्रशासन व सत्ताधारी मंडळी डोळेझाक करीत असल्याने, शहरातील नागरिकांचे मात्र आरोग्य बिघडत चालले आहे. म्हसवड पालिका हद्दीतील नागरिकांना माळशिरस तालुक्यातील इस्लामपूर येथील साठवण तलावातून पाणीपुरवठा केला जाते? असून या पाण्याचे फिल्टरेशन पाॅईंटवर कारखेल (ता. माण) येथे केले जाते. पण या योजनेचे पाणी नागरिकांना गत अनेक महिन्यांपासून मिळत नाही. सध्या कुठले तरी विहिरीचे पाणी सोडले जातेय. तेही फिल्टर केलेले नाही. बिगरफिल्टरचे पाणी पिल्यामुळे नागरिकांना अनेक आरोग्याच्या तक्रारींना सामोरे जावे लागत आहे. शहरातील नागरिकांचे आरोग्य चांगले, निरोगी राहण्यासाठी पालिकेने क्षारमुक्त पाणीपुरवठा करावा, अशी मागणी शहरवासीय करीत आहेत. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा धोका, त्यात क्षारयुक्त पाणी यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
दरम्यान, शहरातील जुना पोस्ट परिसर ते नवी पेठ रस्त्याच्या दोन्ही बाजू दीड महिन्यापूर्वीपासून गटार बांधकामासाठी संबंधित ठेकेदाराने जेसीबीच्या साहाय्याने खोदल्या असून हे काम करीत असताना येथील रहिवाशांच्या पिण्याच्या पाण्याच्या नळ कनेक्शनच्या पाईपलाईन उद्ध्वस्त झाल्या आहेत. त्या पाईपमध्ये गटारीचे पाणी जात असल्याने या भागातील नागरिक दीड महिन्यापासून गटारीचे दुर्गंधीयुक्त मिसळलेले पाणी नळाद्वारे भरत आहेत. याचे सोयरसुतक ना ठेकेदाराला ना पालिकेला. तरी याकडे पालिकेने वेळीच लक्ष द्यावे. अन्यथा या भागातील नागरिकांच्या उग्र रोषाला पालिका प्रशासनाला सामोरे जावे लागेल.