चाफळ : चाफळ विभागातील धायटी गावात पंधरा दिवसांपुर्वी तब्बल २८ जण कोरोनाबाधित आढळून आले होते. संपूर्ण गाव कोरोनाचा हॉट स्पाॅट बनले होते. मात्र शुक्रवार, दि. ३० रोजी पुन्हा २८ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या. यात पंधराजणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
या सर्व रुग्णांवर चाफळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन कुराडे यांनी अहोरात्र प्रयत्न करून योग्य उपचार केल्याने पंधरा कोरोनाग्रस्त रुग्ण बरे झाल्याने गावात समाधानाचे वातावरण पसरले आहे.
चाफळपासून पंधरा किलोमीटर अंतरावर डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या धायटी गावात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी तब्बल २८ जणांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे चाफळसह परिसर हादरून गेला होता. मात्र चाफळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन कुराडे यांनी पंचवीस जणांवर त्यांच्या घरी धायटी गावात रोज जाऊन उपचार केले. त्यामुळे त्यांच्यापैकी बाराजणांनी कोरोनावर मात केली आहे.
पाटण येथील कोरोना सेंटरमध्ये तीनजणांनी उपचार घेऊन कोरोनावर मात केली आहे. उर्वरित तेरा जणांचे अहवाल येणे बाकी असून तेही दोन दिवसांत येतील व संपूर्ण गाव कोरोनामुक्त होईल, अशी अपेक्षा गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, धायटीचे सरपंच संजय देशमुख व पोलीसपाटील शेखर देशमुख यांच्यासह आरोग्य विभाग, पोलीस प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली होती. स्थानिक ग्रामस्थांनीही प्रशासनाचे नियम काटेकोरपणे पाळत सहकार्याची भूमिका घेतल्याने खऱ्याअर्थाने लोक कोरोनामुक्त होत असल्याने ग्रामस्थांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
कोट
धायटीचे सरपंच संजय देशमुख, उंब्रजचे सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांच्या मार्गदर्शनाखाली चाफळ दूरक्षेत्राचे अमृत आळंदी, सुशांत शिंदे, पोलीस पाटील, शेखर देशमुख, ग्रामसेविका ए. एस. गायकवाड, तलाठी एस. आर. देशमुख, तसेच कोरोना कमिटीने गावातील कोरोना रुग्णांची योग्य पध्दतीने काळजी घेतली. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन कुराडे यांनी अहोरात्र केलेल्या उपचारांमुळे गाव कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत असल्याची प्रतिक्रिया माजी सरपंच चंद्रकांत देशमुख यांनी व्यक्त केली आहे.