कऱ्हाड : येथील नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करण्यासाठी तहसील कार्यालय व त्याअंतर्गत असणाऱ्या दहा शासकीय कार्यालयांचे स्थलांतर सुपर मार्केट परिसरातील अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालयाच्या जुन्या इमारतीत करण्यात आले आहे. त्याठिकाणी सोमवार, दि. २ पासून कामकाज सुरू होणार आहे. कऱ्हाडच्या प्रशासकीय इमारतीसाठी माजी मुख्यमंंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निधी मंजूर केला. तसेच विविध खात्यांतील नेत्यांच्या उपस्थितीत नव्याने होणाऱ्या प्रशासकीय इमारतीच्या कामाचे भूमिपूजनही झाले. मात्र लोकसभा व विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यामुळे निवडणूक कामकाजासाठी कार्यालयाचे स्थलांतर थांबविण्यात आले.सत्र न्यायालयाची जुनी इमारत न्यायालयाच्या ताब्यात असल्यामुळे तिचा ताबा नगरपालिके ला मिळत नव्हता. जिल्हा व सत्र न्यायालयाकडून सुपर मार्केट परिसरातील इमारतीचा ताबा न्यायालयाकडून नगरपालिकेला आणि पालिकेकडून महसूल विभागाकडे काही दिवसांपूर्वी देण्यात आला. त्यामुळे मूळच्या तहसील कार्यालयातील साहित्य जुन्या न्यायालयातील इमारतीमध्ये स्थलांतरित केले जात आहेत. तहसील कार्यालयाबरोबर संजय गांधी शाखा, पुरवठा, महसूल शाखा, रेकॉर्ड रूम, निवडूक शाखा, कूळकायदा शाखा, उपकोषागार कार्यालय, दुय्यम कारागृह, दुय्यम निबंधक व विवाह निबंधक क्र. १ आणि २, शहर नगररचना कार्यालय, नागरिक सुविधा केंद्र अशी प्रमुख कार्यालये आणि कऱ्हाड तालुका पोलीस ठाणेही स्थलांतरित झाले आहे. (प्रतिनिधी)
कऱ्हाडचे तहसील कार्यालय स्थलांतरित
By admin | Published: February 01, 2015 12:59 AM