कोयनानगर/शिराळा : पाटण तालुक्यात सोमवारी रात्री ११ वाजून ३७ मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का बसला. याची भूकंपमापन केंद्रावर ३.२ रिश्टर स्केल इतकी नोंद झाली आहे. हा धक्का सातारा जिल्ह्यातील कोयना परिसरात व सांगली जिल्ह्यातील चांदोली परिसरात जाणवला. या भूकंपाच्या धक्क्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.भूकंपाच्या केंद्रबिंदूची खोली १७ किलोमीटर इतकी असून, हा केंद्रबिंदू वारणा खोऱ्यातील चांदोली गावाच्या पूर्वेस ७ किलोमीटरवर व कोयनानगरपासून २४ किलोमीटर अंतरावर होता. या भूकंपाच्या धक्क्याने कोयना धरण सुरक्षित असून, कोणतीही हानी झाली नाही, अशी माहिती कोयना सिंचन विभागाने दिली.
चांदोली परिसरात दोन भूकंपचांदोली (ता. शिराळा) वारणा धरण परिसरात सोमवारी रात्री ११.३७ वाजता ३.२ तर त्यानंतर अवघ्या दोन तासांतच म्हणजे मंगळवारी पहाटे १ वाजून ४९ मिनिटांनी २.९ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला. हे दोन्ही भूकंपाचे धक्के चांदोली परिसरात जाणवले असून, पहिला धक्का सोमवारी रात्री ११:३७ वाजता तर दुसरा धक्का मंगळवारी १:४९ वाजता जाणवला. भूकंपाचा केंद्रबिंदू वारणा धरणापासून २८ किलोमीटर अंतरावर होता. भूकंपाच्या धक्क्यामुळे वारणा धरणाला कोणताही धोका नाही, असे धरण प्रशासनाने सांगितले.