सातारा : उद्घाटनास मनाई व जमावबंदी आदेश असतानाही येथील राजवाडा बसस्थानकावरील भित्तीशिल्पावर झाकलेली ताडपत्री काढून नुकसान करणे व शांततेचा भंग केल्याने मिलिंद एकबोटे, विजय काटवटे यांच्यासह सुमारे ३० जणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, राजवाडा बसस्थानकाच्या आवारात भित्तीशिल्प उभारण्यात आले आहे. या भित्तीशिल्पवर काहींनी आक्षेप घेतला आहे. असे असतानाच सोमवारी सायंकाळच्या सुमारास या भित्तीशिल्पाचे उद्घाटन करण्याचा काही जणांनी प्रयत्न केला.याबाबतची माहिती मिळाल्यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, सहायक पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्यासह पोलिसांची टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. यानंतर प्रतापगड उत्सव समितीचे मिलिंद एकबोटे, भाजप नगरसेवक विजय काटवटे यांच्यासह अनेकांना ताब्यात घेतले. त्यानंतर सर्वांना शाहूपुरी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.याप्रकरणी एसटीच्या आगार व्यवस्थापक रेश्मा गाडेकर यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार प्रतापगड उत्सव समितीचे मिलिंद रमाकांत एकबोटे (रा. शिवाजीनगर, पुणे), भाजप नगरसेवक विजय अजित काटवटे (रा. रामाचा गोट, सातारा), शहाजीबुवा रामदासी (रा. सज्जनगड, ता. सातारा), संकेत विजयकुमार शिंदे (रा. पिलेश्वरीनगर करंजे, सातारा), सूरज सोमनाथ भगत (रा. वडकी, ता. हवेली, जि. पुणे) आणि अनोळखी २५ ते ३० जणांवर गुन्हा नोंद झाला आहे.राजवाडा बसस्थानकातील भित्तीशिल्प उद्घाटनास लेखी पत्र देऊन मनाई असतानाही आणि शस्त्रबंदी, जमावबंदी आदेश असतानाही जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेण्यात आली नाही. या आदेशाचे उल्लंघन करून जमाव जमवणे, भित्तीशिल्पावरील ताडपत्री काढून नुकसान करणे आणि शांततेचा भंग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर पोलिसांनी ३० जणांवर गुन्हा नोंद केला. सहायक फौजदार जगदाळे हे तपास करीत आहेत.
जमावबंदी आदेश भंग केल्याप्रकरणी मिलिंद एकबोटेंसह ३० जणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2021 1:42 PM