चाफळ : चाफळसह विभागात हायब्रीड पिकांवर पाने खाणाऱ्या लष्करी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. कृषी विभागाने पाहणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी चाफळसह परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, संपूर्ण चाफळ विभागातील चाफळसह गमेवाडी, माजगाव, डेरवण, वाघजाईवाडी, जाळगेवाडी, केळोली, शिंगणवाडी, नाणेगाव, खराडवाडी आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात हायब्रीडचे पीक घेतले जाते. यावर्षी विभागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे बांध फुटून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी उगवण झालेले हायब्रीड पीक जोमात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत असतानाच पाने खाणाऱ्या लष्करी अळीचा प्रादुर्भाव जाणवू लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. कोळपणीसह भांगलणीचा एक हात मारल्याने व वेळेत पडणाऱ्या पावसामुळे विभागात यावर्षी काही ठिकाणी पिके जोमात आहेत. परंतु, नेहमीच निसर्गाची अवकृपा सहन करावी लागत आहे. सध्या बळीराजाच्या हायब्रीड पिकांवर लष्कर अळीने हल्ला चढवल्याने विभागातील बळीराजाच्या चिंतेत वाढ झाली आहे. कृषी विभागाने पाहणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी विभागातील शेतकऱ्यांमधून होत आहे.
कोट..
यावर्षी अतिवृष्टीतून पिके वाचल्यानंतर बळीराजा हळूहळू सावरू लागला आहे. यातच सध्या हायब्रीड पिकावर लष्करी अळीने हल्लाबोल केल्याने चिंता वाढली आहे. कृषी विभागाने पाहणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे.
- दादासो पवार, शेतकरी, शिंगणवाडी