सातारा : राज्य सरकारच्या नाकर्ते धोरणामुळे राज्यात कोरोनाच्या नावाखाली गेले दोन वर्षे सैन्य भरती रखडली आहे. ही भरती तात्काळ न झाल्यास मंगळवार, दि. २१ पासून कॉम्रेड सोशल ऑर्गनायझेशन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा संस्थेचे अध्यक्ष जयवंत आरळे व सचिव अमोल साठे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
ते म्हणाले, महाराष्ट्रातील तरुण हजारो रुपये खर्च करून अकॅडमी जॉईन करत आहेत. सैन्य भरतीसाठी १७ वर्षे ६ महिने ते २१ वर्षे अशी वयोमर्यादा असून, २ वर्षे भरती न झाल्याने अनेकजणांची अपेक्षा भंग झाली आहे. होतकरू तरुण हे अहोरात्र शारीरिक व बौद्धिक मेहनत घेत असल्याचे दिसत आहे. राज्यात २ वर्षे भरती न झाल्याने सुमारे २० लाखांहून अधिक तरुण बेरोजगार झाले आहेत. महाराष्ट्र वगळता इतर राज्यांत स्पोर्ट व सेंट्रल भरती सुरू आहे. राज्य सरकार कोरोनाचे कारण पुढे करत भरती टाळत आहे. सैन्य बोर्ड भरती प्रक्रिया करण्यास तयार असताना राज्य सरकारकडून परवानगी दिली जात नाही. त्यामुळे तरुणाचे नुकसान होत आहे. दोन वर्षे भरती न झाल्याने तरुणाचे वय निघून जात आहे. वय निघून गेल्याने कोल्हापूर व रत्नागिरी याठिकाणी तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत.
भरतीसाठी वय वाढवावे..
राज्य सरकारने सैन्य भरतीस परवानगी द्यावी, भरती प्रक्रिया घेणार नसाल तर वय वाढवून मिळावे, अशी मागणी करण्यात येत आहे. असे न झाल्यास मंगळवार, दि. २१ पासून कॉम्रेड सोशल ऑर्गनायझेशन व सैन्य दलाच्या भरतीसाठी प्रयत्न करणारे पश्चिम महाराष्ट्रातील तरुण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचे त्यांनी सांगितले.