सातारा : ‘सर्वसामान्यांना संरक्षण देण्याची जबाबदारी असणारेच जनतेची लूट करत असतील तर आम्हासारखे मावळेच छळग्रस्तांच्या पाठीशी राहून त्यांना संरक्षण देण्यासाठी पुढे येतील. माझ्यावर आरोप करण्याऐवजी बनकर, शिंदे यांनी सर्वप्रथम त्यांची स्वत:ची व त्यांच्या नेत्यांची काळी कारकीर्द तपासावी. तुमच्या बाबतीत ‘दूध का दूध’ आणि ‘दारू का दारू’ हे लवकरच सिद्ध होईल,’ असा प्रतिटोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष संदीप मोझर यांनी लगावला. मोझर म्हणाले, ‘माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांवर आरोप करणाऱ्या आणि स्वत: वकील असल्याचे सांगून वकिलीसाठी कधीही कोर्टात न गेलेल्या बनकरांनी त्यांच्या नेत्यांच्या पावलावर पावले ठेवत लेझीम खेळत पालिकेत येऊन काय दिवे लावलेत, हे सर्वश्रूतच आहे. गोडोली तलावाच्या सुशोभीकरणासाठी लोकवर्गणी स्वत:च्या खिशात घालून कामाचा हिशोब न देणाऱ्या आणि आवश्यकता नसताना आयलँड बांधायला लावून त्याचा मलिदा लाटणाऱ्यांचा मूळ व्यवसाय काय? टोलेजंग इमारतीत राहणाऱ्या बेनटेक्स लोकांचा चरितार्थच खंडणी आणि लोकांना टोप्या घालण्यातूनच चालतो. त्यामुळे त्यांनी आमची मापे काढू नयेत, ते सोसायचेही नाही.मुजरे आणि हुजरे करणाऱ्या अशा कितीतरी बनकर, शिंदे आणि त्यांच्या नेत्यांची अख्खी टीम आडवी आली तरी, अशोक सावंतचे पार्सल सोलापूरला पाठवणारच, असा निर्धार व्यक्त करून मोझर यांनी पत्रकात पुढे म्हटले आहे की, ‘कासपठारावर मुनावळे येथे ५० एकर जमीन तसेच अकलूज, माळीनगर, माळशिरस भागात करोडोंची मालमत्ता असणाऱ्या सावंतसारख्या डिप्लोमा इंजिनिअरच्या घरात मध्यंतरी पाच किलो सोने सापडले होते. ही सर्व संपत्ती खंडणीच्या पैशातून उभी राहिली आहे. त्यांच्याकडूनच टक्केवारी मिळत असते. त्यामुळेच सावंतवरील माझ्या टीकेची मिरची बनकर, शिंदे आणि त्यांच्या नेत्यांच्या नाकाला झोंबत आहे.’ साताऱ्यातील कितीतरी नेतेमंडळी आणि पदाधिकारी साताऱ्याचे नेतृत्व करण्यास सक्षम असताना, परजिल्ह्यातून आलेल्या व टोलनाक्याचे व्यवस्थापन पाहणाऱ्याने आजवर अनेकांना गंडा घातला आहे. पाचगणी, महाबळेश्वरमधील हॉटेल व्यावसायिक, लहान-मोठे ठेकेदार, एमआयडीसीतील उद्योजकांना खंडणी मागणे, दहशत माजवणे आणि खंडणीतील वाटा नेत्यांच्या वाड्यावर पोहोच करणाऱ्यावर आता ‘शोक’ व्यक्त करण्याचीच वेळ येणार आहे. कारण आता त्याच्या पापाचा घडा भरला असून, बनकर, शिंदेसारख्या बोलक्या पोपटांनाही जनता धडा शिकवणार आहे. सुळाचा ओढा मुजवून त्यात इमारत उभी करण्यासाठी लाखोंची माया जमविणाऱ्या, कल्याणी स्कूल समोरील उद्यानाच्या उभारणीत बनवेगिरी करणाऱ्या, नगरपालिकेतून टक्केवारी घेणाऱ्यांना आणि त्यांच्या नेतेमंडळींना सावंतचा पुळका कशासाठी येतो? हे जनतेस समजून सांगण्यासाठी मी जीवाचे रान करेल. मात्र, कोणाचीही दहशत खपवून घेणार नाही.’ असेही मोझर यांनी पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी) मी दूर झाल्यानेच तुमचा नेता भयभीत !‘विसावा नाक्यावरील अनेक टपरीचालकांकडून पिग्मी रुपाने दररोज हप्ते वसूल करणाऱ्यांचे उत्पन्नच आता अतिक्रमण हटवल्याने ठप्प झाले आहे. आम्हाला जास्त खोलात जायला लावू नका. हप्ते आणि खंडणीच्या पैशावर पोट भरणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की, मला टेकूची गरज नाही. तर माझ्याच टेकूवरच तुमच्या तंबूचा डोलारा तोलला होता. मी दूर झाल्यानेच तो डळमळीत झाला व तुमच्यासह तुमचा नेता भयभीत झाला आहे.’ ‘औंध संस्थानशी केलेली दलाली उघड झाल्याने तुमचा बोलवता धनी तुमच्या दारांवर काही वर्षांपूर्वी लाथा घालून गेला होता. उपनगराध्यक्ष पदावेळी खंडणीची पाकिटे न मिळाल्याने अनेकांना ब्लॅकमेल केले होते, हे सातारकर विसरले नाहीत. दरम्यान, लेवे खून खटल्याच्या अगोदरपासूनच्या तुमच्या चिठ्ठ्या-चपाट्या मला माहीत आहेत. अगदी कालपर्यंतचा गुप्त गोष्टी मी टप्प्याटप्प्याने उघड करणार आहे. त्यामुळे आगे आगे देखो होता है क्या?’ असा इशाराही संदीप मोझर यांनी पत्रकात दिला आहे.
‘दूध’ अन् ‘दारू का दारू’ सिद्ध होईल !
By admin | Published: April 05, 2017 11:20 PM