वाठार निंबाळकर : दुधाचा दर कमी झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. गत तीन महिन्यांपूर्वी मिळणारा प्रतिलिटर ३३ रुपये ५० पैसे हा दर आता २२ रुपये प्रतिलिटर इतका झाला आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.फलटण तालुक्यातील अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी कर्ज काढून दुग्धव्यवसाय सुरू केलेला आहे. सर्व काही सुरळीतपणे सुरू होते. गत तीन महिन्यांपासून अचानक दुधाचे दर कमी झाल्याने पशुखाद्य चारा व औषधोपचार याचा खर्चही पदरमोड करून करावा लागत आहे. आज फलटण तालुक्यात गायी व म्हैस अशी जवळपास ९२,००० इतकी जनावरांची संख्या असून, हजारो तरुण दूध व्यवसाय करीत आहेत.कडवळ व मका या चाऱ्याचा दर प्रतिअडीच गुंठे साडेतीन ते चार हजार रुपये इतका असून, पशुखाद्य १४०० ते १७०० रुपये प्रति ५९ किलो इतका आहे. भुस्सा १२०० रुपये ते १४०० रुपये प्रति ४९ किलोसाठी असा दर आहे. अशा परिस्थितीत एका गायीसाठी प्रतिदिन कमीत कमी २५ किलो चारा, त्यासाठी कडवळ अथवा मका याचा खर्च १४५ ते १५० रुपये, पशुखाद्य कमीत कमी ५ किलो, त्यासाठी ११८ ते १३५ रुपये इतका तर भुस्सा ५ किलो त्यासाठी १२२ ते १४२ रुपये इतका, टॉनिक व इतर औषधे यासाठी ५० रुपये इतका असा प्रतिदिन एका गायीसाठी ४३५ रुपये ते ४७७ रुपये इतका खर्च येत आहे.एक गाय दिवसाला सरासरी १६ ते १८ लिटर दूध देते, त्याचे सध्याच्या २२ रुपये दराप्रमाणे ३५२ ते ३९६ रुपये इतके उत्पादन मिळते. गाय आजारी पडली तर अचानकपणे येणाऱ्या आजारासाठी तीन ते चार हजार रुपये आणायचे कोठून? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तरी शासनाने पूर्वीप्रमाणे ३५ ते ३८ रुपये प्रतिलिटर दूध दर द्यावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांमधून होत आहे.
उन्हाळ्यात चारा उपलब्ध नाही, बागायत परिसरातून साडेतीन ते चार हजार रुपये प्रति अडीच गुंठ्यासाठी द्यावे लागत असून, वाहतुकीसाठी वेगळा खर्च होतो आहे. त्यात दुधाचा दर वाढण्याऐवजी कमी झाल्याने पदरमोड करून जनावरे जगवावी लागत आहेत.-नामदेव काळे, शेतकरी, मिरढे, ता. फलटण
नोकरीअभावी बँकेचे कर्ज काढून व्यवसाय केला. मात्र, सध्या दर कमी झाल्याने रोजचा तोटा सहन करावा लागत आहे. तातडीने दरवाढ न केल्यास आत्मदहन करणार आहे.-दादासाहेब निंबाळकर, शेतकरी, तावडी