कऱ्हाड : दूध दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेल्या आंदोलनाची धग तिसऱ्या दिवशीही कायम आहे. कऱ्हाड तालुक्यातील करवडी येथे ग्रामदैवताच्या मंदिरात युवकांनी दुग्धाभिषेक घालण्यासह स्वत:ही दुधाने अंघोळ केली. तसेच शेकडो लिटर दूध त्यांनी रस्त्यावर ओतले. तालुक्यातील इतर गावांतील दूध संकलनही सकाळपासून ठप्प होते.स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाच्या दरासाठी सोमवारपासून आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. पुणे, मुंबईसह इतर ठिकाणी पाठविले जाणारे दूध संघटनेने रोखले आहे. तसेच या आंदोलनाला दूध संकलन केंद्र्रांसह शेतकऱ्यांनीही पाठिंबा दिल्याने आंदोलनाची व्याप्ती वाढली आहे.
कोठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ठिकठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त तैनात आहे. तसेच स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे यांनाही मंगळवारी रात्री पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली.बुधवारी सकाळपासून तालुक्यातील बहुतांश गावांतील दूध संकलन बंद होते. स्थानिक डेअरी बंद ठेवण्यात आल्या होत्या. शेतकरीही गायी, म्हशीच्या दुधाचे कॅन घरातच ठेवून होते. करवडीतील काही युवकांनी जमा झालेले दूध एका कॅनमध्ये भरून ते ग्रामदैवताच्या मंदिरात आणले. त्याचठिकाणी त्यांनी त्या दुधाने अंघोळ केली.
या घटनेची माहिती मिळताच कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी त्याठिकाणी दाखल झाले. गावात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. कऱ्हाड -तासगाव, विटा, पाटण तसेच आशियाई महामार्गावरही पोलिसांकडून गस्त घातली जात आहे.