सातारा : अन्न व औषध प्रशासनाने जिल्ह्यात विविध ठिकाणी छापे घालून जप्त केलेला गुटखा, जर्दा, सुगंधी सुपारी आदी १३ लाख ६० हजार ६७३ रुपयांचा साठा येथील औद्योगिक वसाहतीमधील स्वाती आॅइल मिलच्या बॉयलरमध्ये जाळून नष्ट केला. अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त रामलिंग बोडके यांनी ही माहिती दिली.राज्यात गुटखा बंदी असताना बेकायदेशीरपणे वाहतूक करताना, विक्री करताना अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने २८ आॅगस्ट २०१३ ते १६ जून २०१४ या कालावधीत जिल्ह्यामध्ये ३६ ठिकाणी छापे टाकले होते. या छाप्यात विविध कंपन्यांचा गुटखा, तंबाखू, विलायची सुपारी, चुना मिक्स टोबॅको, जाफरानी पत्ती, खैनी, सेंटेड सुपारी, सेंटेड टोबॅको, पान मसाला आदी उत्पादनाचा समावेश होता. याची किंमत १३ लाख ६० हजार ६७३ रुपये इतकी होती. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी ए. आर. वांद्रे, डी. बी. निमक, वाय. एच. ढाणे, यू. एस. लोहकरे, एस. बी. अंकुश, आर. ए. खापने, आर. एस. बोडके, एस. एम. दांगट, व्ही. व्ही. रूपनवर, आय. एस. हवालदार यांच्या पथकाने केली होती. (प्रतिनिधी)पाच ठिकाणी छापे टाकून सहाजणांना अटकअन्न व औषध प्रशासनचे सातारा येथील सहायक आयुक्त बोडके म्हणाले, ‘जिल्ह्यात जून २०१४ ते आजअखेर पाच ठिकाणी छापे टाकून सात लाख ६७ हजार ८३३ रुपयांचा बेकायदेशीर गुटखा साठा जप्त करण्यात आला. या कारवाईत सहाजणांना अटक करण्यात आली. दरम्यान, या पुढेही गुटखा विरोधी मोहीम तीव्र करण्यात येणार आहे. बेकायदेशीर वाहतूक करणे अथवा गुटखा विक्री करणाऱ्यांबाबत अन्न व औषध प्रशासन कार्यालयास माहिती देण्याचे आवाहनही बोडके यांनी केले आहे.
लाखोंचा गुटखा भट्टीत नष्ट
By admin | Published: August 31, 2014 10:13 PM