शाहूपुरी : कोणत्याही शहरातील रस्ते ही त्या गावांची ओळख, प्रशासन अन् ग्रामस्थांची मानसिकता सांगतात. म्हणूनच गावच्या वेशीवर स्वागत कमानी लावल्या जातात; पण साताऱ्यातील काही रस्त्यांवर वेगळीच परिस्थिती निर्माण झाली आहे. मोळाचा ओढा ते बुधवार नाका या दरम्यान रस्त्याच्या कडेला लाखोंचे भंगार धुळखात पडून आहे. सातारा शहरातील रस्ते अनेक वर्षांपासून चर्चेचा विषय बनले आहेत. जागतिक किर्तीचे महाबळेश्वर, पाचगणी, कास, बामणोली, ठोसेघर, पाटण हे सातारा जिल्ह्यातच असल्याने जगभरातून पर्यटक येतात. यापूर्वी अनेक वर्षे शहरातील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते. काही संघटनांनी चक्क या खड्ड्यांची गिणती केली तर काहींनी वाढदिवस साजरे केले. काहींनी तर रोपे लावली. मोळाचा ओढा ते बुधवार नाका हा सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत येत आहे. शहरात सर्वत्र चकाचक डांबरीकरण झाले असले तरी हा रस्ता दुर्लक्षित राहिला आहे. तो रुंद आहे. यामुळे या परिसरातील व्यावसायिकांनी रस्त्याच्या कडेला भंगारातील साहित्य टाकून अतिक्रमण केले आहे. या रस्त्यावर दोन अरुंद पूल आहेत. येथून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागते. भंगारात घालण्याजोग्या, सुटे भाग अनेक वर्षांपासून रस्त्याच्या कडेलाच पडलेले आहेत. या परिसरात मोठी दुकाने असल्याने अवजड वाहनांची वर्दळ असते. त्यातच भंगारातील वाहने बाजूला असल्याने जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. (वार्ताहर)
रस्त्याच्या कडेला लाखांचं भंगार धूळखात पडून !
By admin | Published: October 18, 2016 12:44 AM