सातारा : कोरोनाच्या काळात लॉकडाऊन असताना सरकार जर निवडणुका घेऊ शकते, तर बारावीच्या परीक्षा का नाही? परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना करिअर निवडीचा पर्याय शोधणं शक्य होऊ शकतं. समज असणाऱ्या बारावीतील विद्यार्थ्यांना कोविड मार्गदर्शक तत्त्वानुसार परीक्षा केंद्रांवर येण्यास सांगितले गेले, तर परीक्षा सुरळीतपणे पार पडू शकतात, असा मतप्रवाह साताऱ्यातून व्यक्त केला जात आहे.
कोरोनाची दुसरी लाट सुरू असल्याने दहावीप्रमाणेच बारावीच्या परीक्षाही रद्द कराव्यात का? याविषयी विचारमंथन सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या करिअरचा विचार करता, बारावी सर्वाधिक महत्त्वाचे वर्ष आहे. दहावीनंतर निवडलेली शाखा योग्य आहे का इथपासून या शाखेत पुढं कोणत्या मार्गाने जायचं, यावर परीक्षेनंतरच शिक्कामोर्तब होतो. गुणांकन पद्धतीने गुण दिले गेले, तर त्याचा सर्वाधिक फटका हुषार विद्यार्थ्यांना बसणार आहे. अनेक स्पर्धात्मक परीक्षांना आवश्यक असणारी अर्हता बदलणं, गुणांकनात बदल करणं, आदी गोष्टी कराव्या लागणार आहेत. बोर्डाच्या परीक्षांना उशीर झाल्यामुळे मुलांनी बोर्डाचा अभ्यास करायचा? का इतर शाखेतील प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या सीईटीचा अभ्यास करायचा? असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला आहे.
कोविडची दुसरी लाट परमोच्चस्थानी असताना, मोठ्या राज्यांत निवडणुका, कुंभमेळे होऊ शकतात, हे सर्वांनी पाहिलंय. निवडणुका आणि मेळ्यापेक्षा सध्या मुलांचे करिअर महत्त्वाचे आहे. वर्तनाचे भान असलेल्या बारावीतील मुलांना कोविडचे नियम पाळून परीक्षा केंद्रांवर यायला लावणं, हा त्यातील उत्तम मार्ग असल्याचं बहुतांश शिक्षणतज्ज्ञ आणि पालकांचे म्हणणे आहे.
विद्यार्थी कोट :
१. दहावी आणि बारावी ही दोन्ही वर्षे आमच्या आयुष्यात सर्वाधिक खराब गेली. दहावीत असताना पुराने हैदोस मांडला आणि प्रचंड ताणात आम्हाला अभ्यास करावा लागला. बारावीत चांगले गुण पाडायचं म्हटलं तर दीड वर्षे ऑनलाईन शिक्षण सुरू झालं. परीक्षा घेतल्या, तर आम्हाला आमच्या आकलनाची पात्रता कळेल, त्यामुळे परीक्षा होणं महत्त्वाचं आहे.
- शफिक शेख, सदरबझार, सातारा
२. बारावीचं वर्ष ऑनलाईन सुरू झालं. पहिले काही दिवस प्राध्यापक काय शिकवतात, हेच समजायला वेळ गेला. बारावीतून सहिसलामत सुटू म्हणून अभ्यासाची घोकंपट्टी सुरू केली आणि परीक्षा घ्यायची का रद्द करायची, यावर विचारमंथन सुरू झालं. बारावीत कोणालाही नापास करू नका, असं ठरवून गुणवंत विद्यार्थ्यांच्या कष्टाचं फळ व्हावं, असं वाटते.
- संयुक्ता कुलकर्णी, मंगळवार पेठ
३. कोरोनाची मगरमिठी अधिक घट्ट होऊ लागली आहे. ‘बचेंगे तो और भी लढेंगे’ हे तत्त्व लक्षात घेऊन शासनाने परीक्षा घेण्याचा घाट घालू नये. कोविडची दुसरी लाट तरुणांसाठी सर्वाधिक धोक्याची आहे. परीक्षा केंद्रावर कोणा एकाला बाधा झाली, तर अनेकजण धोक्यात जातील. दहावीतील गुणांच्याआधारे सरसकट विद्यार्थी उत्तीर्ण करावेत, असे मला वाटते.
- हर्षवर्धन जाधव, सातारा
प्राध्यापक कोट :
१. अन्न, वस्त्र, निवारा याबरोबरच आधुनिक काळात शिक्षण ही मूलभूत गरज आहे. दुर्दैवाने कोविड काळात शिक्षण ही सर्वाधिक दुर्लक्षित बाब ठरली. प्राध्यापकांनी आपल्या परीने ऑनलाईन अभ्यास करून विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम केले. परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांचे मूल्यांकन व्हावे, असे वाटते.
- प्रा. सुधीर इंगळे, औंध
२. बारावीनंतर अनेक स्पर्धात्मक परीक्षेसाठी त्यांचे योग्य मूल्यमापन हा एक निकष असतो. तीन-चार दिवसांच्या फरकाने एकेक पेपर घेतला तरीही दीड महिन्यात सर्व पेपर संपतील. मुलांना किती समजलं आणि काय अडखळलं याचे मूल्यमापन करण्यासाठी परीक्षा हा एकच पर्याय आहे. परीक्षांना दुसरा काही पर्याय असूच शकत नाही.
- एस. पी. खरात, सातारा
३. कोविडमुळे मुलं आधीच हतबल झाली आहेत. त्यात परत परीक्षांचा गोंधळ सुरू झालाय. शासनाने निर्णय घेऊन मोकळं व्हावं. वारंवार परीक्षांच्या विषयाने मुलांना अभ्यास करण्यातही मन लागेना. एका वर्गात बारा पंधरा विद्यार्थी बसवून परीक्षा घेतल्या तरी हरकत नाही. याबाबत अंतिम निर्णय तातडीने होणे अपेक्षित आहे.
- प्रा. डॉ. प्रतिमा पवार, गोडोली, सातारा