मलकापूर : ऊसतोडणी मजुरांना घेऊन बीड जिल्ह्यात निघालेल्या ट्रॅक्टरसह ट्रॉलीला मिनीबसने पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात आठ ऊसतोड मजूर व मिनिबसमधील दहा प्रवासी असे १८ जण जखमी झाले. जखमींपैकी एका ऊसतोड मजुरासह बसमधील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. पुणे-बंगळुरू आशियाई महामार्गावर येथील गंधर्व हॉटेलजवळ शुक्रवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
दत्तात्रय लिंबाजी वाळभाट (वय २३, रा. आहेरवडगाव, ता. जि. बीड) या ऊसतोड मजुरासह अन्य सतरा जण जखमी आहेत. काही जखमींवर प्राथमिक उपचार करून सोडून देण्यात आले. तर काही जखमींना विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. अपघातस्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, ट्रॅक्टर (एमएच २३ एएस १६३६) हा ट्रॉलीमधून साहित्यासह ८ ऊसतोड मजुरांना घेऊन अथनी शुगरवरून बीडकडे जात होता. पुणे-बंगळुरू महामार्गावर येथील गंधर्व हॉटेलजवळ आले असता चिकमंगळूरहून साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी १० प्रवासी घेऊन पुण्याकडे जाणाऱ्या मिनीबसवरील (केए १८ सी ४१५९) चालकाचा ताबा सुटल्याने बसची ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक बसली. या धडकेत ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये बसलेले ८ ऊसतोड मजूर, मिनीबसमधील १० असे अठरा जण जखमी झाले. जखमींपैकी एका ऊसतोड मजुरासह बसमधील दोघे गंभीर जखमी आहेत.
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग देखभाल विभागाचे कर्मचारी अमित पवार, दस्तगीर आगा, अमोल भिसे, अजित भोसले, योगेश पवार, भाऊसाहेब यादव, महेश होवाळ तातडीने अपघातस्थळी दखल झाले. अपघाताची खबर कऱ्हाड शहर पोलिसांसह महामार्ग पोलिसांना दिली. पोलीसही घाटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या मदतीने गंभीर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर देखभाल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वाहने बाजूला घेतली व महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.
फोटो : ०५केआरडी०४
कॅप्शन : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मलकापूरच्या हद्दीत शुक्रवारी सकाळी ट्रॅक्टर-ट्रॉलीला मिनीबसची धडक बसली. अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले.