कोयनानगर : ‘कोण आम्हाला गद्दार, कोण गटारातील पाणी, अन्य कोणी रेडे म्हणाले. असे म्हणणारेच आता आतमध्ये आहेत, तर आम्ही मंत्री झालो आहोत, अशी टीका उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी संजय राऊत यांच्यावर केली. तसेच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याविषयी व्यक्तिगत कोण बोलणार नाही. त्यांच्याशी आमचे वैचारिक मतभेद झाले आहेत, असेही स्पष्ट केले.दौलतनगर, ता. पाटण येथे कॅबिनेट मंत्री झाल्याबद्दल शंभूराज देसाई यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या सभेला विजयादेवी देसाई, रविराज देसाई, यशराज देसाई, भाजपचे भरत पाटील, आदींची प्रमुख उपस्थिती होती.मंत्री देसाई म्हणाले, ‘आम्ही गद्दारी केली म्हणतात; पण बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी खरी प्रतारणा कोणी केली, त्यांचे विचार किती पाळले हे पहिल्यांदा तपासण्याची गरज आहे. ‘मविआ’ सरकारामध्ये मंत्री असताना निधी वाटपात दुजाभाव झाला. मी विरोधी आमदार असताना जेवढा निधी मिळाला, त्यापेक्षा कमी निधी राज्यमंत्री असताना मिळाला. विधानसभेत निवडून आलेल्या आमदारांवर गैरविश्वास दाखविला होता, तो आम्हाला खटकला.त्यानंतर उठाव झाला तो महाराष्ट्राने पाहिले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आहेत. आम्ही मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर विश्वास ठेवत खांद्यावर मान ठेवली आहे. मग, पुढे काहीही होवो. या उठावादरम्यान माझ्या कुटुंबातील व्यक्तींनी विश्वास दाखवला. जनतेने मला पाठिंबा दिला, त्याबद्दल आभारी आहे.’
या सभेमध्ये विजय शिंदे, चंद्रकांत पाटील, पांडुरंग नलावडे, बाळकृष्ण काजाळे, नामदेव साळुंखे, बशीर खोंदू, आदींनी मनोगत व्यक्त केले. डॉ. दिलीप चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. विजय पवार यांनी आभार मानले.
१३७ गावांसाठी २५ कोटींचा निधी...
पाटण तालुक्यातील जनतेशी आमचे चार पिढ्यांचे संबंध आहेत. चांगल्या काळात सगळे असतात; पण पडत्या काळात कोण नसतं. तालुक्यातील जनतेने एकवीस वर्षे पडतीच्या काळात साथ दिली. खातं कोणतं मिळालं याबाबत मी कधीही रस दाखवला नाही. मला जे दिलं त्याचं मी सोनं केलं, असेही मंत्री देसाई यांनी स्पष्ट केले. तसेच देसाई यांनी तालुक्यातील १३७ गावांना २५ कोटींचा तातडीने निधी दिल्याचे सभेत जाहीर केले.