प्रमोद सुकरेकऱ्हाड : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पाटण विधानसभा मतदार संघात महायुतीच्या उमेदवाराला मिळालेली कमी मते पाटणचे शिवसेनेचे आमदार, पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या चांगलेच जिव्हारी लागलेले दिसत आहे.म्हणून तर शनिवारी कार्यकर्यांच्या मेळाव्यात बोलताना मला मंत्रीपदातून मुक्त करा असे मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार असल्याचे जाहीर वक्तव्य त्यांनी केले. तर रविवारी मतदार संघातीलच मल्हारपेठ येथे एका पुस्तक प्रकाशन समारंभात मी हे पुस्तक वेळ मिळाला की वाचून प्रतिक्रिया देतो पण आता जातो कारण माझी उद्या मुंबईत परिक्षा आहे. बघतो आता पेपर कसा आहे म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
लोकसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीने चांगले यश संपादन केले आहे. सातारा जिल्ह्यात महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले विजयी झाले असले तरी त्यांना पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पाटण विधानसभा मतदारसंघातच सुमारे २ हजार ९०० मते कमी आहेत. ही बाब जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याच्या मंत्रिमंडळातील एक जबाबदार मंत्री म्हणून शंभूराज देसाई यांना कमीपणाची मानली जात आहे.वास्तविक मंत्री शंभूराज देसाई यांनी निवडणूक प्रचारात मतदारसंघात प्रचार करताना मी स्वतः निवडणुकीला उभा आहे असे समजा, चांगले मताधिक्य द्या, मला कमीपणा देऊ नका अशी साद आपल्या कार्यकर्त्यांना प्रचार सभेमधून घातली. पण प्रत्यक्षात निकालानंतर दस्तूर खुद्द पालकमंत्र्यांच्याच विधानसभा मतदारसंघात उमेदवाराला कमी मते मिळाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मंत्री देसाई अस्वस्थ असल्याचे बोलले जात आहे.त्याचीच प्रचिती गेले दोन दिवस ते कार्यक्रमातून बोलताना येत आहे.त्यांच्या विधानांनी तालुक्यातील जनतेत उलट सुलट चर्चा सुरू आहेत.शनिवारी पाटण तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या घेतलेल्या मेळाव्यात लोकसभा निवडणुकीत मतदार संघात मिळालेल्या मतांचा मंत्री देसाई यांनी आढावा घेतला. आता मी माझ्या मतदार संघात युतीच्या उमेदवाराला कमी पडलेल्या मतांची जबाबदारी स्विकारुन मला राज्याच्या मंत्रिमंडळातून मुक्त करावे अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचे सांगून कार्यकर्त्यांना धक्का दिला. त्यामुळे मंत्री देसाई आता काय करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.रविवारी दुपारी मतदारसंघातील मल्हारपेठ येथे प्रदिप पाटील यांच्या 'दुर्गजिज्ञासा ' या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला मंत्री देसाईंनी धावती हजेरी लावली.पुस्तक प्रकाशन होताच मला बोलू द्या मला पुढे जायचे आहे असे म्हणत देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्ह्यातील गडांचा अभ्यास करणारे 'दुर्गजिज्ञासा' हे पुस्तक चांगले आहे. त्याचे वाचन करून मी माझी प्रतिक्रिया कळवितो. पण सध्या माझी घाई आहे. उद्या माझी मुंबई परीक्षा आहे. पेपर कसा येतो ते जरा बघतो असे सांगत त्यांनी सर्वांचा निरोप घेतला.मते देताना हे लोक कोठे असतात हे समजत नाही पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला यायला उशीर झाला त्याबद्दल सुरुवातीलाच मंत्री देसाईंनी दिलगिरी व्यक्त केली. पण त्याचे कारण सांगताना मतदार संघातील लोकांसाठी आयोजित जनता दरबार मध्ये जास्त गर्दी होती असे सांगितले. निवडणुकीला मते कमी पडली तरी जनता दरबाराची गर्दी कमी होत नाही. मते देताना हे लोक कुठे असतात ते समजत नाही असेही ते म्हणाले.