सातारा : जिल्ह्यातील विधानसभेच्या ८ आमदारांना सरासरी सव्वाचार कोटी रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून देण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई व आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी सर्वाधिक कामे सूचवली. ३१ मार्चपूर्वी त्यांना दिलेल्या निधीपैकी बहुतांश निधी त्यांनी खर्च केेलेला आहे.
आमदारांना दिलेला निधी हा ३१ मार्चपूर्वी खर्च करणे अपेक्षित असते. आ. चव्हाण यांच्या नावावर सर्वात कमी १ कोटी ९५ लाख ९५ हजार रुपयांचा निधी दिसत असला, तरी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कामे मंजूर करून घेतली होती. तसेच ही कामे तत्काळ मार्गीदेखील लावली आहेत. मात्र इतर आमदारांनी जिल्हा परिषदेकडील कामेही सुचवली होती. जिल्हा परिषदेने जरी निधी खर्च केला नाही, तरी तो वाया जात नाही, हा निधी पुढील आर्थिक वर्षात वापरला जाणार आहे. मात्र, कऱ्हाड दक्षिणसाठी आगामी काळात आणखी निधी देणे शक्य होणार आहे.
पृथ्वीराज चव्हाण : १ कोटी ९५ लाख इतका निधी मिळाला. त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कामे सुचवली असल्याने ३१ मार्चपूर्वी हा सर्व निधी खर्च झालेला आहे.
महेश शिंदे : यांना ३ कोटी २१ लाख ८० हजार रुपयांचा निधी मंजूर झाला होता. यापैकी काही निधी खर्च होण्याची शक्यता आहे. तसेच काही निधी उरणार असल्याने तो पुढीलवर्षी खर्च करता येणार आहे.
मकरंद पाटील : वाई मतदारसंघामध्ये ३ कोटी ८६ लाख १० हजार रुपये इतका निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मिळाला होता. त्यांनी काही गावांमध्ये सामाजिक भवन उभारले. ऱस्त्यांच्या निर्मितीसाठीही त्यांनी जिल्हा परिषदेकडे निधी वर्ग केला आहे.
दीपक चव्हाण : फलटणचे आमदार दीपक चव्हाण यांना ४ कोटी ४४ लाख ९० हजार इतका निधी मिळाला होता, त्यांनीही बहुतांश निधी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून खर्च केला. हा निधी खर्चायला त्यांना मुदत मिळणार आहे.
जयकुमार गोरे : माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी तालुक्यातील पाझर तलावांच्या कामांना महत्त्व दिले. दोन्ही तालुके दुष्काळी असल्याने पाण्याचे दुर्भिक्ष्य दूर करण्यावर त्यांनी भर दिला. त्यांना ४ कोटी ५८ लाख २४ हजार रुपयांचा निधी मिळाला होता.
बाळासाहेब पाटील : सहकार मंत्री तथा कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब पाटील यांना ४ कोटी ८० लाख ७६ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला. त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिलेला निधी खर्च केला आहे. उर्वरित जो निधी जिल्हा परिषदेकडून खर्च करायचा होता, त्याची आकडेवारी मिळालेली नाही.
शंभूराज देसाई : पाटण तालुक्याचे आमदार व राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना ३ कोटी २१ लाख ३४ हजार रुपयांचा निधी हा जिल्हा नियोजनमधून मिळाला होता. त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून मिळालेला निधी हा मतदारसंघातील रस्ते पक्के करण्यासाठी खर्च केलेला आहे.
खासदारांचे काय?
खासदार श्रीनिवास पाटील - यांनी जिल्ह्यातील दुर्गम भागासाठी निधी दिला. तसेच ज्या भागात विकास योग्य पध्दतीने झाला नव्हता, त्याठिकाणी योग्य पध्दतीने विकासाची संकल्पना राबविण्यावर त्यांनी भर दिला आहे.
खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर - यांनी रेल्वे मार्ग विकसित करण्यावर भर दिला आहे. फलटण, खटाव, माण तालुक्यांतील काही गावांमध्येही त्यांनी विकासकामे राबविली आहेत.