प्रमोद सुकरे
कराड : पाटण तालुका शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या शेतकरी विकास परिवर्तन पँनेलने १५ जागा जिंकत ऐतिहासिक सत्तांतर घडविले. ४० वर्षानंतर झालेल्या या सत्तांतराने देसाई गटाला चांगलेच बळ मिळाले आहे. म्हणून तर विजयी मिरवणुकीत मंत्री देसाईंनी पाटणकरांच्या वाड्यासमोरच शड्डू ठोकून भविष्यातील निवडणुकीसाठी 'है तैयार हम' असेच संकेत दिले आहेत.
मंत्री शंभूराज देसाई हे खरंतर संघर्षातून उभे राहिलेले नेतृत्व आहे. पराभवाच्या अनेक ठेचा खाल्ल्यानंतर २००४ साली ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर त्यांना जरा थांबावे लागले. पुन्हा २०१४ पासून त्यांची विजयी घौडदौड सुरू झाली. सन २०१९ लाही ते आमदार झाले. राज्यात सत्ता आल्यावर सुरुवातीला राज्यमंत्री आणि आता कॅबिनेट मंत्री पदाबरोबर जिल्ह्याचे पालकमंत्री पद त्यांना मिळाले. त्याचा निश्चितच फायदा त्यांना झालेला दिसतो.
आपल्या मतदारसंघातील पकड पक्की करायचे असेल तर केवळ विधानसभा निवडणुकीचा विचार करून चालणार नाही. इतर निवडणुकातही तितकेच लक्ष घातले पाहिजे; हे देसाई यांनी पक्के ओळखले. म्हणून तर त्यांनी विकास कामांची कोटींची उड्डाणे मारत पहिल्यांदा लोकांचा विश्वास संपादन केला. आणि ग्रामपंचायत निवडणुकीत मोठे यश मिळविले. त्यानंतर सोसायटी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना बळ दिले. त्याचाच परिणाम म्हणून बाजार समितीची सत्ता ताब्यात घेत विक्रमसिंह पाटणकर व सत्यजित पाटणकर यांच्या सत्तेच्या वाड्याचा एक बुरुज त्यांनी ढसाळला असेच म्हणावे लागेल.
जिल्हा बँक प्रवेशाचा मार्ग सुकर
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत तालुक्यातील विकास सोसायटीचे प्रतिनिधित्व करता यावे अशी 'शंभूराज' यांचीही इच्छा होती. पण अनेक वर्ष त्यांना हुलकावणी दिली गेली. गत वेळी झालेल्या निवडणुकीत ते उभे राहिले मात्र त्यांना यशाप्रत पोहोचता आले नाही. मात्र त्यानंतर सोसायटी निवडणुकांत तालुक्यात झालेली सत्तांतरे आणि बाजार समिती निवडणुकीत मिळालेले यश पाहता यापुढील जिल्हा बँक निवडणुकीत त्यांचा प्रवेशाचा मार्ग सुकर झाला असेच म्हणावे लागेल.
विरोधकांनाही 'भाकरी' फिरवावी लागणार?
पाटण विधानसभा मतदारसंघात आजवरच्या लढती या देसाई आणि पाटणकर यांच्यातच झालेल्या दिसतात. मात्र अलीकडच्या काही वर्षात देसाईंना मिळणारे यश आणि पाटणकरांची होणारी पीछेहाट पाहता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत विरोधी महाविकास आघाडीला उमेदवाराची 'भाकरी' फिरवावी लागणार काय? अशाही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.
यशराज देसाईंचे कष्ट
खरंतर बाजार समितीच्या निवडणुक प्रचारात मंत्री शंभूराज देसाई फारसे कुठे दिसलेच नाहीत. यातली बरीचशी जबाबदारी साखर कारखान्याचे अध्यक्ष यशराज देसाईंनी उचलली. त्यामुळे झालेल्या सत्तांतरात 'यशराज' देसाई यांचे नेतृत्व उजळून निघाले असेच म्हणावे लागेल.
या निवडणुका झाल्या बिनविरोध
गत वर्षभरामध्ये पाटण तालुक्यातील खरेदी विक्री संघ, कोयना कृषक संस्था व बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना या मुख्य तीन संस्थांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. पैकी देसाई कारखाना हा मंत्री देसाई यांच्या ताब्यात तर खरेदी विक्री संघ व कोयना कृषक संस्था पाटणकर गटाच्या ताब्यात राहिली आहे.