सातारा : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पाटण तालुक्यातील ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळविले असून स्थानिक आमदारांनीही आपले गड राखले आहेत. पाटण आणि खटावमध्ये शिवसेना - भाजपने तर वाईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादा गटाने तर कोरेगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शशिकांत शिंदे यांनी अधिकाधिक ग्रामपंचायती आपल्याकडे राखल्या आहेत.सातारा तालुक्यातील कारी, धावडशी, नित्रळ, मानेवाडी या चार ग्रामपंचायतीत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपली सत्ता कायम राखली आहे. पाटण तालुक्यात पालकमंत्री शंभूराज देसाई गटाने सहा ठिकाणी सत्तांतर करत २६ पैकी २० ग्रामपंचायतींवर वर्चस्व ठेवले आहे. माण तालुक्यात भाजपाचे आमदार जयकुमार गोरे गटाने ५ पैकी ४ ग्रामपंचायतींवर बाजी मारली. खटाव तालुक्यातील बुध, नवलेवाडी व काटेवाडी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे निर्विवाद वर्चस्व राहिले. निमसोड, निढळ, त्रिमली, राष्ट्रवादी व पुसेगाव पोटनिवडणुकीत स्थानिक आघाडी पुरस्कृत गटाने बाजी मारली.
फलटण येथे रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या गटाने दोन तर खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या गटाने दाेन गावांवर वर्चस्व ठेवले आहे. वाई तालुक्यात मकरंद पाटील यांनी पुन्हा वर्चस्व मिळवले आहे. कोरेगाव तालुक्यात आसरे, चांदवडी आणि वेलंग (शिरंबे) ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यश मिळविले आहे. आमदार महेश शिंदे यांच्या गटाने तडवळे संमत कोरेगाव आणि भाटमवाडी ग्रामपंचायत आपल्या ताब्यात घेतली आहे. त्रिपुटीतील एका जागेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला आहे.कऱ्हाड तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींचे निकाल सोमवारी जाहीर झाले. टेंभू ग्रामपंचायतीत सत्तांतर घडविण्यात विरोधकांना यश आले असले तरी ‘ गड आला पण सिंह गेला ’ असा निकाल पाहायला मिळाला आहे. रेठरेत अपेक्षेप्रमाणे भाजपाने एकहाती सत्ता राखलीय तर कऱ्हाड उत्तरेत आमदार बाळासाहेब पाटील यांचीच बाजी दिसली. दक्षिणेत काँग्रेसला तीन ग्रामपंचायतीत तर भाजपाला एका ठिकाणी विजय मिळाला आहे.