प्रमोद सुकरे
कराड: सातारा जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक नजीकच्या काळात होऊ घातली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. पाटण तालुकाही त्याला अपवाद नाही; पण पाटणचे आमदार, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी मात्र याबाबत मौन बाळगले आहे. परिणामी निवडणुकीबाबतची त्यांची भूमिका गुलदस्त्यातच आहे. राज्य व पाटण तालुक्यातील राजकीय वारे बदललेले आहे; त्याचा फायदा मंत्री देसाई घेणार का, याची कार्यकर्त्यांना उत्सुकता आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजे जिल्ह्याची अर्थवाहिनी होय. लोकनेते बाळासाहेब देसाई तर या बँकेच्या संस्थापकांपैकी एक होत. त्यांनी बँकेवर संचालक म्हणून काम केले. त्यांच्या पश्चात शिवाजीराव देसाई यांनीदेखील जिल्हा बँकेत संचालक पद सांभाळले. मात्र त्यानंतर पाटण तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलली आणि विक्रमसिंह पाटणकर आणि जिल्हा बँकेची पायरी चढली ती आजवर उतरलेली नाही. गेली कित्येक वर्ष विक्रमसिंह पाटणकर विकास सोसायटी गटातून बँकेत पाटणचे प्रतिनिधित्व करीत आहेत.
माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर यांची जिल्हा बँकेवर प्रदीर्घ काळ पकड होती. उंडाळकर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर त्यांचे संबंध खूप चांगले होते. त्यामुळे जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असतानाही विलासराव पाटील बँकेचा कारभार एकहाती चालवित होते. पाटण तालुक्यातील ढेबेवाडी खोरे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात असल्याने जिल्हा बँक निवडणुकीत पाटणकर यांना नेहमीच उंडाळकर यांची मदत झाली. त्याचाच लाभ घेत विधानसभा मतदारसंघावरही पाटणकरांनी आपला पगडा कायम ठेवण्यात यश मिळवले.
आता काळ बदलला आहे. जिल्हा बँकेवर राष्ट्रवादीने पकड केली आहे. कराड दक्षिण व पाटण विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना झाली आहे. ज्येष्ठ नेते विलासराव पाटील आज हयात नाहीत. पाटणकरांची आमदारकी आज उरलेली नाही. शंभूराज देसाई यांनी आमदारकी खेचून घेतली आहे. आता तर महाविकास आघाडी सरकारमध्ये शंभूराज देसाई गृह व वित्त विभागाचे राज्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत. नव्या पुनर्रचनेत पाटणला जोडलेला कराड तालुक्यातील सुपने तांबवे भागातील उंडाळकरांचे बहुसंख्य कार्यकर्ते देसाईंबरोबर दिसत आहेत. या साऱ्याचा फायदा मंत्री देसाईंना जिल्हा बँकेसाठी होऊ शकतो. तो फायदा ते उठवणार का, हे पाहावे लागणार आहे.
शंभूराज देसाई यांनी यापूर्वी एक दोन वेळा जिल्हा बँकेची निवडणूक लढविण्याचा प्रयत्न केला; पण त्यात त्यांना यश आले नाही. मग कधी कार्यकर्त्यांना निवडणूक रिंगणात उतरण्याचा त्यांनी प्रयत्न केला तर कधी शेवटच्या क्षणी अर्ज मागे घेत बिनविरोधचा मार्गही त्यांनी मोकळा करून दिला आहे. पण जिल्हा बँकेवर प्रतिनिधित्व करण्याची त्यांची सुप्त इचछा आजही कायम आहे.
आज राजकीय वातावरण बदलले आहे. शंभूराज देसाई यांना ते अनुकूल आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. पवार आणि देसाई यांचे संबंध चांगले आहेत. या सगळ्याचा फायदा त्यांना जिल्हा बँकेत प्रवेश करण्यासाठी होऊ शकतो. पण मंत्री देसाई तो करून घेणार का, हा सुद्धा प्रश्न आहे.
अधिवेशनाला जाण्यापूर्वी कराड येथे झालेल्या एका पत्रकार परिषदेत मंत्री देसाईंना माध्यमांच्या प्रतिनिधींनी जिल्हा बँक निवडणुकीसंदर्भात छेडले. मात्र आमच्या पक्षाची अजून जिल्हास्तरावर बैठक व्हायची आहे; ती झाली की आम्ही भूमिका स्पष्ट करून असे ते म्हणाले. पण अजून तरी शिवसेनेच्या जिल्ह्यातील नेत्यांची बैठक झाल्याचे कानावर नाही. त्यामुळे शंभूराज देसाई यांची भूमिका गुलदस्त्यातच आहे.
चौकट :
अजितदादांच्या शब्दाला दिला होता मान...
जिल्हा बँकेच्या एका निवडणुकीत शंभूराज देसाई यांनी पत्नी स्मितादेवी देसाई यांचा अर्ज महिला गटातून व विरोधी पॅनेलमधून दाखल केला होता. मात्र त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी देसाईंना फोन करून अर्ज मागे घेण्याची विनंती केली होती. अजित दादांच्या शब्दाला देसाईंनी मान दिला व अर्ज मागे घेतला. आता महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असलेल्या देसाईंनी उपमुख्यमंत्री असलेल्या अजित दादांना एखादा शब्द टाकला तर, देसाई कुटुंबातील सदस्य जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात दिसू शकतो.
चौकट :
मंत्री देसाई व ॲड. उदय पाटील साडू!
पाटणचे आमदार, गृहमंत्री शंभूराज देसाई व कराड दक्षिण काँग्रेसचे नेते ॲड. उदय पाटील-उंडाळकर हे सख्खे साडू आहेत. असे नातेसंबंध असतानाही विधानसभा असो वा जिल्हा बँक निवडणूक असो माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांनी नेहमीच विक्रमसिंह पाटणकर यांना मदत करत मैत्री जोपासली. आता मात्र मंत्री देसाई व ॲड. उदय पाटील यांचे राजकीय संबंध चांगले दिसत आहेत. याचा फायदा देसाईंना नक्की होणार आहे.
फोटो :
11 शंभूराज देसाई 01