कोपर्डे हवेली : गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून गावोगावचे पथदिवे बंद आहेत. यासंदर्भात सरपंच परिषदेने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि राज्याचे मंत्री यांची भेट घेऊन पथदिव्यांचा वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी केली.
पंधराव्या वित्त आयोगांतर्गत केंद्र सरकारने ग्रामपंचायतींना निधी दिलेला आहे. यातील बहुतांशी निधी विकासकामे आणि कोरोनावर खर्च झाला आहे. या निधीतून आराखड्यातील मुलभूत आणि पायाभूत असलेली कामे करणे गरजेचे आहे. पथदिव्यांचे बिल पंधराव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतीने भरावे, असे आदेश राज्य सरकारने काढलेले आहेत. हा आदेश ग्रामपंचायतींच्या हक्कावर घाला घालणारा आहे. पथदिव्यांच्या बिलाबाबत योग्य तो निर्णय घेऊन तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी सरपंच परिषदेने केेली आहे.
सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री नितीन राऊत, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना सरपंच परिषदेतर्फे निवेदन देण्यात आले आहे. यावेळी पुणे सरपंच परिषदेचे अध्यक्ष जितेंद्र भोसले, प्रदेशाध्यक्ष ज्ञानेश्वर वायाल, कार्याध्यक्ष शंकरराव खापे, मार्गदर्शक कोहिनूर सय्यद, सुजित हंगरेकर, के. पी. पाटील, आदी उपस्थित होते.