लोकमत न्यूज नेटवर्क
कऱ्हाड : सातारा व सांगली जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक नजीकच्या काळात होऊ घातली आहे. कच्ची मतदार यादी प्रसिद्ध झाल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्याचाच प्रत्यय शुक्रवारी कऱ्हाडात आला. मंत्री विश्वजित कदम यांनी शुक्रवारी रात्री कऱ्हाडला बरीच खलबते केली. त्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
कडेगाव, खानापूर, वाळवा या सांगली जिल्ह्यातील तीन तालुक्यांत कृष्णा कारखान्याचे सभासद मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील नेत्यांचा या निवडणुकीवर नेहमीच प्रभाव पाहायला मिळतो. कडेगाव - पलूस मतदार संघाचे आमदार व राज्यमंत्री विश्वजीत कदम हे ‘कृष्णा’च्या कार्यक्षेत्रातच येतात. कदम परिवाराने कृष्णेच्या निवडणुकीत नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यंदा तर मंत्री विश्वजित कदम यांनी या निवडणुकीत चांगले लक्ष घातले आहे. आपण डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या पाठीशी ठाम असल्याचे ते जाहीरपणे सांगतात.
कृष्णा सहकारी साखर कारखान्याची सत्ता सध्या सहकार पॅनलचे प्रमुख डॉ. सुरेश भोसले व डॉ. अतुल भोसले यांच्या ताब्यात आहे. तर माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते यांचे रयत पॅनल व अविनाश मोहिते यांचे संस्थापक पॅनल सत्ताधाऱ्यांविरोधात लढत देण्यासाठी प्रयत्नरत आहेत. डॉ. इंद्रजित मोहिते यांची कारखान्यात सत्ता यावी, अशी मंत्री कदम यांची धारणा आहे. त्यासाठी त्यांचे प्रयत्न बऱ्याच दिवसांपासून सुरू आहेत. त्याला कसे व किती यश येतंय, हे पाहावे लागेल.
शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास मंत्री कदम यांच्या गाड्यांचा ताफा डाॅ. इंद्रजित मोहिते यांच्या कऱ्हाड येथील निवासस्थानी धडकला. त्या दोघांच्यात सुमारे दीड तास कमराबंद चर्चा झाली. त्यानंतर मंत्री कदम हे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानी पोहोचले; तेथे पृथ्वीराज चव्हाण, रयत कारखान्याचे अध्यक्ष उदयसिंह पाटील व मंत्री विश्वजित कदम या तिघांची बराचवेळ कमराबंद चर्चा झाली. या चर्चेचा अधिकृत तपशील समोर आला नसला, तरी ही चर्चा कृष्णा कारखाना निवडणुकीच्या अनुषंगाने होती, हे निश्चित!
चौकट
मुंबईतही केली होती बैठक
मंत्री विश्वजित कदम यांनी यापूर्वीही मुंबई येथे कृष्णा कारखाना निवडणूक पार्श्वभूमीवर एक बैठक घडवून आणली होती. या बैठकीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गृहमंत्री सतेज पाटील, काँग्रेसचे नेते उदयसिंह पाटील, डॉ. इंद्रजित मोहिते, कऱ्हाड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे व काही मोजके प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. त्या बैठकीत बरीच चर्चा झाली पण चर्चेची गाडी पुढे किती सरकलीय, हे समजत नाही.
चौकट
चव्हाणांनी जाणून घेतली आहेत कार्यकर्त्यांची मते
कृष्णा कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कऱ्हाड दक्षिणेतील प्रमुख कार्यकर्त्यांची महिनाभरापूर्वी बैठक घेतली होती. त्या बैठकीत कृष्णा कारखाना निवडणुकीत काय करावे, याबाबत कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली होती. त्यावेळी कार्यकर्त्यांना चव्हाणांनी कानमंत्रही दिला होता.
चौकट
मनोमिलनाची चर्चा सुरूच...
सत्ताधारी भोसले गटाविरोधात कृष्णा कारखान्याचे दोन माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते व अविनाश मोहिते यांचे मनोमिलन होणार, याबाबतच्या चर्चा आजही कार्यक्षेत्रात सुरू आहेत. मंत्री विश्वजित कदम यांनीही पत्रकारांशी बोलताना मनोमिलनासाठी मनापासून व प्रामाणिक प्रयत्नांची गरज आहे, असे सूचक वक्तव्य केले आहे. त्यामुळे सभासदांमध्ये याबाबतच्या उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
चौकट
फोनवरुन साधला अनेकांशी संवाद...
मंत्री विश्वजीत कदम यांचे कऱ्हाड तालुक्यातही पै पाहुण्यांचे जाळे आहे. कऱ्हाड दौऱ्यावर असताना त्यांनी अनेकांशी फोनवरुन संपर्क साधला. निवडणुकीच्या अनुषंगाने काय परिस्थिती आहे, याची माहिती जाणून घेतली.
फोटो : कृष्णा कारखाना संग्रहित