सातारा : महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेने सुरू केलेले लेखणी बंद आंदोलन गुरुवारी सातारा जिल्हा परिषदेमध्ये सातव्या दिवशीही सुरूच होते. त्यामुळे मिनी मंत्रालयाचे कामकाज गुरुवारी ही ठप्पच राहिले. दिवसभर कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या वऱ्हांड्यात बसून आपला निषेध व्यक्त केला. तर द्वारसभा घेऊन आमच्या मागण्या मान्य करा, अशा घोषणा देत परिसर दुमदुमून सोडला.जिल्हा परिषदेतील लिपिकांनी पंधरा जुलैपासून आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत लेखणी बंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे मिनी मंत्रालयाचे कामकाज ठप्प झाले असून, जिल्हाभरातून येणाऱ्या सामान्य माणसांची कामे होणे अशक्य झाली आहेत. लोकांना होणारा त्रास लक्षात घेऊन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुभाष नलवडे व उपाध्यक्ष रवींद्र साळुंखे यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रव्यवहार करून कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती केली आहे. तसेच पालकमंत्री विजय शिवतारे व मंत्री महादेव जानकर यांनाही शिष्टमंडळाने भेटून निवेदन दिले आहे. या अधिवेशनात प्रश्न मिटावा, अशी कर्मचाऱ्यांची भावना आहे. मात्र, अजूनतरी त्याला यश आलेले दिसत नाही.या आंदोलनात जिल्हाध्यक्ष विलास शितोळे, सचिव विकास नलवडे, राज्य कार्यकारिणी सदस्य मारुती जाधव, राज्यप्रवक्ते जितेंद्र देसाई, सल्लागार शंकर धुलुगडे यांच्यासह सर्व कर्मचारी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)यांनी दिला गुरुवारी पाठिंबाजिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेच्या लेखणी बंद आंदोलनाला गुरुवारी महाराष्ट्र राज्य कृषी विभाग लिपिक संवर्गसंघटनेने लेखी पाठिंबा दिला. या पाठिंब्याच्या पत्रावर जिल्हाध्यक्ष जयंत जाधव, सचिन विनायक देवकर यांच्या सह्या आहेत. त्याचबरोबर सातारा जिल्हा माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेनेही गुरुवारी पाठिंब्याचे पत्र दिले. या पत्रावर जिल्हाध्यक्ष अनिल माने, कार्याध्यक्ष सचिन माने आदींच्या सह्या आहेत. लेखणी बंद आंदोलनात दररोज पाठिंब्याची भरच पडत चालली आहे.
मिनी मंत्रालयाचे काम सातव्या दिवशीही ठप्प
By admin | Published: July 21, 2016 11:03 PM