गोडोली : आईने मारल्याचा राग मनात ठेवून घर सोडून आलेल्या अल्पवयीन मुलाला सातारा बसस्थानकातील पोलिसांनी सोमवारी रात्री बारा वाजता पालकांच्या ताब्यात दिले. याबाबत बसस्थानक पोलिसांनी दिलेली माहीती अशी की, माळशिरस तालुक्यातील मोटेवाडी येथील सोमनाथ शहाजी सिद (वय १४) या अल्पवयीन मुलास शाळेतून येण्यास उशीर झाला म्हणून आईने मारले होते. या गोष्टीचा राग मनात ठेवून तो घरातून पळून आला होता.
माळशिरसमधून निघालेला सोमनाथ हा नातेपुते, बारामती ते सातारा असा प्रवास करून सोमवारी सायंकाळी पाच वाजता साताऱ्यात पोहोचला. याठिकाणी आल्यानंतर सोमनाथ हा इतरत्र फिरून रात्री बसस्थानकात झोपी गेला. दरम्यान, बसस्थानक पोलिस चौकीतील पोलिस हवालदार दत्ता पवार, प्रवीण पवार, केतन शिंदे यांनी सोमनाथला पाहिले.
संशय आल्याने पोलिसांनी त्याला बसस्थानक चौकीत बसवून त्याची आस्थेवाईकपणे चौकशी केली असता वेगळीच माहिती समोर आली. शाळेतूून येण्यास उशीर झाल्याने आईने मारहाण केली म्हणून घर सोडून पळून आल्याचे सोमनाथने पोलिसांना सांगितले. घरच्यांना न सांगता इतक्या दूर आल्यामुळे पालक रागावतील या भीतीने सोमनाथ सातारा बसस्थानकातच झोपला होता.
पोलिसांनी माळशिरस पोलिस ठाण्याशी संपर्क साधून सोमनाथच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती दिली. रात्री बारा वाजण्याच्या सुमारास सोमनाथचे कुटुंबीय साताऱ्यात आल्यानंतर पोलिसांनी सोमनाथला त्यांच्या ताब्यात दिले.