दत्ता यादव
सातारा : ऑनलाइन अभ्यासाच्या नावाखाली मुलांच्या हातात आलेल्या मोबाइलमुळे किशाेरवयीन मुलांचे आयुष्य अलीकडे क्षणात उद्ध्वस्त होतंय. कोणाला पब्जीचे तर कोणाला पाॅर्नचे व्यसन. यातूनच काही मुलांनी स्वत:चे आयुष्य संपवले तर काही जणांनी दुसऱ्याचे संपविल्याचे अनेक घटनांमधून आपण पाहतोय. असाच काहीसा प्रकार सातारा शहराजवळील म्हसवे येथे घडलाय.
नववी व दहावीतील दोन मुले दिवसभर मोबाइलवर पाॅर्न पाहतात अन् संध्याकाळी दहावीतील मुलाची अधिकच बैचेनी वाढते. अशातच शेजारचा पाच वर्षांचा चिमुकला समोरून जाताना त्याच्या नजरेत भरतो आणि जे पुढे घडते, त्याचा कोणी विचारही करू शकणार नाही.
म्हसवे गावातील संजू (नाव बदललेले) हा दहावीमध्ये साताऱ्यातील एका शाळेत शिकत आहे. त्याची घरची परिस्थिती हलाखीची. वडील गवंडी काम करतात. मुलगा शिकला तर आपले हे दिवस पालटतील म्हणून वडील दिवसरात्र काम करताहेत. कोरोनाकाळात ऑनलाइन शिक्षण सुरू झालं. त्यामुळे ऐपत नसतानाही वडिलांनी त्याला पैसे साठवून १२ हजार रुपयांचा मोबाइल घेऊन दिला. मुलगा दहावीला असल्यामुळे जे हवं ते त्याला वडील घेऊन देत होते. खरं तर ऑनलाइन शिक्षणाच्या काळातच मुलाचे पाऊल चुकीच्या मार्गावर पडलं होतं. मात्र, हे वडिलांच्या लक्षात आलं नव्हतं. तो सतत मोबाइलमध्ये डोकावून बसायचा. तसा संजू एकमार्गी. पण एके दिवशी त्याच्याहून एक वर्षाने लहान असलेला नववीतील मित्र त्याच्याजवळ आला. त्याला पाॅर्नचे संकतेस्थळ त्याने दाखविले. त्याचक्षणी दोघांनी मिळून पाॅर्न पाहिले. पण, तिथून पुढे संजूला जणूकाय चटकच लागली.
पाॅर्नच्या धुंदीची अशीही कहाणी..
घटना घडली त्या दिवशीही त्या नववीतील मित्रासोबत त्याने दिवसभर पाॅर्न पाहिले. संध्याकाळी तो इतका अस्वस्थ झाला की त्याला काहीही सुचत नव्हतेे. त्याच्या घरासमोरून पाच वर्षांचा विकी (नाव बदलेले) जात होता. त्याला त्याने हाक मारून थांबवलं. चल इथून येऊ, असं म्हणून एका पडक्या घरात त्याला नेलं. इथं गेल्यानंतर त्याने विकीचे कपडे काढून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचाराचा प्रयत्न सुरू केला. त्यावेळी विकी ओरडू लागला म्हणून त्याने विकीचे तोंड आणि गळा दाबला. विकीची हालचाल शांत झाल्यानंतरच संजूही शांत झाला. पण जेव्हा संजू भानावर आला तेव्हा मात्र, त्याची पाचावर धारण बसली. विकीचा मृत्यू झालाय, हे लक्षात येताच त्याने तेथून धूम ठोकली. पण, सरतेशेवटी पोलिसांनी पाॅर्नच्या धुंदीची कहाणी समाजासमोर आणली.