मलकापूर : ट्रेलरच्या हाफ ग्रिसिंगचे काम सुरू असताना अचानक टायर फुटून डिस्कची थाळी डोक्यावर आपटल्याने वृद्ध मिस्त्रीचा जागीच मृत्यू झाला. कोयना वसाहत-शिंदेनगर येथे शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. प्रल्हाद नाना देशमुख (वय ७५, रा. कापिल, ता. कऱ्हाड) असे मृत्यू झालेल्या मिस्त्रीचे नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कोयना वसाहत-शिंदेनगर येथे कापिलमधील टी. व्ही. जाधव यांच्या मालकीचे ‘चेतन स्टिल इंडस्ट्रीज’ नावाचे वर्कशॉप आहे. या वर्कशॉपमध्ये ट्रॅक्टर, ट्रॉलीसह इतर वाहनांच्या हाफ ग्रिसिंगची कामे केली जातात. कापिल येथील प्रल्हाद देशमुख हे या वर्कशॉपमध्ये कामास होते. त्यांच्यासोबत आणखी एक कामगार त्याठिकाणी काम करीत होता. शुक्रवारी सकाळी देशमुख वर्कशॉपमध्ये आले. त्यावेळी एक ट्रॅक्टर ट्रॉली हाफ ग्रिसिंगच्या कामासाठी वर्कशॉपमध्ये आली होती. कामावर येताच देशमुख यांनी संबंधित ट्रॅक्टर ट्रॉलीचे काम हाती घेतले. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ते ट्रेलरच्या उजव्या बाजूचा पाठीमागील टायर खोलत होते. त्यांनी टायरच्या हाफची नटबोल्ट खोलली. मात्र, त्याचवेळी अचानक टायर फुटला. त्यामुळे टायरसह डिस्कची बाहेरील बाजूची थाळी जोरात उडाली. ती थाळी देशमुख यांच्या डोक्यावर आपटली. या दुर्घटनेत देशमुख रक्तबंबाळ झाले. परिसरातील नागरिक व व्यावसायिकांनी त्याठिकाणी धाव घेऊन त्यांना उपचारार्थ कृष्णा रुग्णालयात हलविले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, टायर फुटलेला आवाज एवढा मोठा होता की, भुसुरुंगाचा स्फोट झाला असावा, असा परिसरातील नागरिकांचा समज झाला. नागरिकांनी त्याठिकाणी धाव घेतली. घटनास्थळी टायरच्या ट्यूबचे तुकडे व डिस्कच्या थाळ्या विखुरल्या होत्या. घटनेची नोंद कऱ्हाड शहर पोलिसांत झाली आहे. (प्रतिनिधी)नटबोल्ट गंजल्याने दुर्घटनाप्रल्हाद देशमुख जो टायर खोलत होते, त्या टायरची पोलिसांनी पाहणी केली. त्यावेळी टायरच्या डिस्कची नटबोल्ट गंजल्याचे पोलिसांना दिसून आले. डिस्कची नटबोल्ट यापूर्वीच गंजली असावीत. संबंधित टायर फक्त हाफच्या नटबोल्टवर होता. ज्यावेळी देशमुख यांनी हाफची नटबोल्ट खोलली, त्यावेळी डिस्कच्या नटबोल्टवर ताण वाढून ती तुटली असावीत आणि टायर फुटला असावा, असा पोलिसांचा कयास आहे. वीस वर्षे प्रामाणिक कामकापिल येथील टी. व्ही जाधव यांच्या चेतन स्टिल वर्क्स या वर्कशॉपमध्ये प्रल्हाद देशमुख गेल्या वीस वर्षांपासून कामास होते. हाफ ग्रिसिंगच्या कामात त्यांचा हातखंडा होता. अनेक वाहनधारक आवर्जून देशमुख यांच्याकडूनच आपल्या वाहनाचे काम करून घेत होते. संपूर्ण वर्कशॉपची जबाबदारी देण्याएवढा टी. व्ही. जाधव यांचा देशमुख यांच्यावर विश्वास होता.
डोक्यावर डिस्क आदळून मिस्त्री ठार
By admin | Published: October 23, 2015 10:06 PM