कऱ्हाड : पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून मित्राच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण करीत त्याचा खून करण्यात आला. नांदगाव, (ता. कऱ्हाड) येथे मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी एकास कऱ्हाड तालुका पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. अभिजित भीमराव काळे (वय २८) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तर, संतोष मारुती औताडे याला पोलिसांनी या प्रकरणात अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदगाव येथील अभिजित काळे याची गावातीलच संतोष औताडे याच्याशी मैत्री होती. काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून त्या दोघांमध्ये वाद झाला होता. मात्र, वाद झाल्यानंतरही ते एकमेकांशी बोलत होते. संतोष सर्व विसरला असावा, असा अभिजितचा समज होता. मात्र, काही दिवसांपूर्वी झालेल्या वादाचा राग संतोषच्या मनात होता. सोमवारी रात्री नऊच्या सुमारास अभिजित गावातील विंग रस्त्यावर थांबला होता. त्यावेळी संतोषची त्याच्याशी भेट झाली. संतोषने त्याला ‘जेवणाची पार्टी करू,’ असे सांगून पवारवाडी गावच्या हद्दीतील ‘ढोकरमळा’ नावाच्या शिवारात नेले. रात्री अकरा वाजेपर्यंत ते त्याठिकाणी होते. त्यावेळी त्यांच्यात पुन्हा किरकोळ वाद होऊन भांडण झाले. दोघांत त्यादरम्यान झटापटही झाली. वादावादी सुरू असतानाच संतोषने शेजारी पडलेले लाकडी दांडके उचलून ते अभिजितच्या डोक्यात मारले. त्यामुळे अभिजित रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्याला त्याच स्थितीत सोडून संतोष तेथून निघून गेला. दरम्यान, मंगळवारी सकाळी ग्रामस्थ ‘ढोकरमळा’ शिवारात गेले असताना त्यांना अभिजित रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडल्याचे दिसले. ग्रामस्थांनी याबाबतची माहिती पोलिसपाटील दिलीप पाटील यांना दिली. त्यांनी याबाबत कऱ्हाड तालुका पोलिसांत माहिती दिली. त्यानंतर पोलिस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर, निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, सहायक निरीक्षक विवेक पाटील, प्रकाश राठोड, गुन्हे शाखेचे शशिकांत काळे, अमित पवार, चौधरी, ए. एस. माने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. तसेच घटनेची चौकशी सुरू केली. त्यावेळी रात्री अभिजित व संतोष दोघेही या शिवारात गेल्याचे काही ग्रामस्थांनी पाहिल्याचे समोर आले. पोलिसांनी संतोषला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली. घटनेची नोंद कऱ्हाड तालुका पोलिसांत झाली आहे. सहायक पोलिस निरीक्षक विवेक पाटील तपास करीत आहेत. (प्रतिनिधी) डोक्यात लाकडी दांडक्याने केली मारहाण संतोषने अभिजितच्या डोक्यात लाकडी दांडक्याने दोन ते तीनवेळा घाव घातल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. तसेच अभिजितच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याचेही घटनास्थळी दिसून आले. त्यामुळे डोक्याला मार लागून व अतिरक्तस्राव होऊन अभिजितचा मृत्यू झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
पूर्ववैमनस्यातून मित्राचा खून
By admin | Published: November 15, 2016 11:33 PM