सातारा : जालना येथील मराठा समाज आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या बंदला सातारा जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. सातारा शहरातील भाजीमंडई वगळता सातारा शहरात सर्व व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली होती. बंदच्या पार्श्वभुमीवर सातारा येथील पोवई नाक्यावर पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. जिल्हा बंदमुळे सकाळपासूनच बाजारपेठेत शुकशुकाट होता. सातारा एसटी आगारातही शुकशुकाट जाणवत होत्या.तथापी, केवळ शहरातील एसटी फेऱ्या बंद ठेवण्यात आल्या तर ग्रामीण भागातील तसेच लांब पल्ल्याच्या एसटी फेऱ्या सुरू ठेवल्या आहेत. दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाने मराठा समाजाला सकाळी ९ वाजता पोवई नाक्यावर उपस्थित राहण्याचे आवाहन केल्यामुळे पोवई नाक्यावर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला होता. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकारी पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यानजिक जमले. यावेळी पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी कायदेशीर मार्गाने निवेदन सादर करण्याचे आवाहन केले. यानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. माध्यमांशी बोलताना मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा समाज हा सर्व समाज घटकांना बरोबर घेवून जाणारा आहे. कोणाचेही आरक्षण हिरावून न घेता केवळ या समाजाला आरक्षण द्यावे आणि मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याप्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली. यावेळी एक मराठा लाख मराठा, तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणा देण्यात आल्या.
मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या बंदला सातारा जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद, बाजारपेठेत शुकशुकाट
By दीपक शिंदे | Published: September 04, 2023 11:32 AM