खंडाळा : जिल्ह्यातील सहकार आणि राजकीयदृष्ट्या चर्चेच्या ठरलेल्या खंडाळा तालुका सहकारी साखर कारखाना निवडणुकीत आमदार मकरंद पाटील यांचा करिष्मा चालला. राष्ट्रवादीच्या शेतकरी विकास परिवर्तन पॅनेलने बाळसिद्धनाथ संस्थापक पॅनेलचा धुव्वा उडवत सर्व २१ जागा जिंकत सत्तांतर घडविले. त्यामुळे कारखान्यात ‘परिवर्तन’ पर्व सुरू झाले आहे.
खंडाळा तालुक्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या खंडाळा तालुका सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अतिशय चुरशीची झाली. त्यातच बाळसिद्धनाथ संस्थापक पॅनेल व शेतकरी विकास परिवर्तन पॅनेलमध्ये सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला होता. दोन्ही पॅनेलच्या दृष्टीने निवडणूक प्रतिष्ठेची ठरली. रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली. सुमारे ८० टक्के मतदान झाले. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
खंडाळ्यात मंगळवारी मतमोजणी झाली. यामध्ये शेतकरी विकास परिवर्तन पॅनलने सर्वच्या सर्व २१ जागा जिंकत सत्ताधारी संस्थापक पॅनेलचा धुव्वा उडवला. त्यामुळे कारखान्यात प्रथमच सत्तांतर घडल्याने राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली परिवर्तनाचे नवे पर्व सुरू झाले आहे. तसेच तालुक्याच्या राजकारणात आमदार मकरंद पाटील यांचाच करिष्मा असल्याचेही या निकालाने सिद्ध केले आहे.
दरम्यान, कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच निवडणूक झाली. मतदारांचा अंदाज कोणालाच नव्हता. त्यामुळे प्रत्यक्ष गाठी-भेटींवर भर देण्यात आला होता. वास्तविक कारखाना स्थापनेपासून सभासद बनवताना संस्थापकांनी लोकांना प्रेरित करून शेअर्स जमा केले होते. त्यामुळे ते मूळ विचारांशी ठाम राहतील, अशी अपेक्षा होती; मात्र आमदार मकरंद पाटील यांच्या कार्यशैलीवर विश्वास ठेवून सभासदांनी परिवर्तनला साथ दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
मोठ्या फरकाने विजय-
राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित शेतकरी विकास परिवर्तन पॅनेलचे ऊस उत्पादक गटातील उमेदवार साधारणपणे ११०० ते १२०० मतांच्या फरकाने विजयी झाले आहेत. तर राखीव जागांवरील पाचही उमेदवारांनी १५०० ते १६०० मतांच्या फरकाने विजय मिळविला. संस्था गटातील उमेदवार ४५७ मतांनी विजयी झाला आहे.
दिग्गजांचा पराभव अन् विजयही-
निवडणुकीत कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव गाढवे यांचा पराभव झाला. त्याचबरोबर संचालक अनिरुध्द गाढवे, बापूराव धायगुडे यांनाही विजय मिळवता आला नाही. तर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील, जिल्हा बँकेचे संचालक दत्तानाना ढमाळ, पंचायत समितीचे सभापती राजेंद्र तांबे, माजी सभापती रमेश धायगुडे, ज्ञानदीप पतसंस्थेचे संस्थापक विश्वनाथ पवार आदी दिग्गज निवडून आले आहेत.