सातारा : ‘माझ्या झोपेबाबत त्यांना कुणी सांगितलं कळत नाही. मला छान झोप लागते. सकाळी साडेसहाला जाग येते, तसेच माझे पोट सुटू नये, यासाठी मी व्यायाम करतो, त्यामुळे त्यांनी माझ्या झोपेची काळजी करु नये, पण, गेल्या पाच वर्षात नगरपालिकेचा कारभार ज्या पद्धतीने केला त्यावरुन सातारकरांची मात्र झोप उडाली आहे’ असा पलटवार आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर केला आहे.
आपल्यावर टीका केल्याशिवाय काहींना झोपच लागत नाही, अशी टीका उदयनराजेंनी केली होती. सुरुची बंगलो येथे पत्रकारांशी बोलताना शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, ‘मी जमिनीवरचा माणूस आहे. मला हवेत जाण्याची हौस नाही. त्यांचं कामच तसं वाऱ्यावर आहे. मी काही गोष्टी निटनिटक्या करतो, त्यामुळं माझं पोट सुटणार नाही.
माझ्याप्रमाणे सातारकर जमिनीवर आहेत, तेच वाऱ्यावर आहेत. ५ वर्षांच्या पालिकेतील कारभारामुळे सातारकर नागरिकांची झोप उडवली आहे. सातारा विकास आघाडीने पाच वर्षांत सातारकरांचा पैसा लुटून खाल्ला आहे. या पाच वर्षांत एकतरी मोठा प्रकल्प पालिकेच्या माध्यमातून उभा राहिला का?’
निवडणूक तोंडावर आली की कामे करत असल्याचा बहाणा सुरू आहे. हेच पाच वर्षांमध्ये केले असते तर ठीक होते. हद्दवाढीचा निर्णय मी मार्गी लावला, कास उंची वाढविण्याच्या प्रकल्पाला अजितदादांकडून मी सुधारित प्रशासकीय मान्यता मिळवली. आता सत्ता त्यांची असल्याने कामांची उद्घाटने मात्र ते करत आहेत, असेही शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.
राज्यपालांनी खुलासा करावा
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कर्तबगारीच्या जोरावर स्वराज्य निर्माण केले. राजमाता जिजाऊंनी त्यांना मार्गदर्शन केले. मात्र, शिवाजी महाराजांची तुलना दुसऱ्या कुणाशी करणे चुकीचे आहे. त्यामुळे राज्यपाल महाेदयांनी केलेल्या वक्तव्याबाबत खुलासा केला पाहिजे, असे शिवेंद्रसिंहराजे म्हणाले आहेत.