सातारा : सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सिल्वर ओकवर जाऊन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांची भेट घेऊन जिल्हा बँकेचे अध्यक्षपद देण्याची मागणी केलेली आहे. गुरुवारी अजित पवारांना भेटल्यानंतर शिवेंद्रराजे यांनी शुक्रवारी लगेचच थोरल्या पवारांसमोर आपल्या मनातील इच्छा व्यक्त केली.संपूर्ण देशभर नावलौकिक असलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचीनिवडणूक नुकतीच पार पडली. आता अध्यक्षपदासाठी चुरस निर्माण झाल्याचे चित्र आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच साताऱ्यात येऊन अपक्ष निवडून आलेल्या उमेदवारांची भेट घेतली होती. निवडणुकीनंतर राजकीय बदलल्याचे चित्र पाहायला मिळत असताना भाजपचे आमदार व याआधीही जिल्हा बँकेचे अध्यक्षपद भूषविलेले शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पुन्हा आपल्यालाच जिल्हा बँकेचे अध्यक्षपद मिळावे, अशी मागणी पवारांकडे केलेली आहे.शिवेंद्रराजे शुक्रवारी सिल्वर ओकवर जाऊन खासदार पवारांना भेटले. त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. शिवेंद्रसिंहराजे आपण बँक उत्तम चालवली. अगदी भाऊसाहेब महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण काम करताय असे गौरवोद्गार यावेळी काढले तर बँकेत कोणतेही राजकारण न आणता सगळ्यांना सोबत घेऊन कारभार केला, असे शिवेंद्रसिंहराजेंनी पवारांना सांगितले. ‘मी पुन्हा अध्यक्षपदासाठी इच्छुक आहे तर हे पद मला मिळावे,’ अशी मागणी शिवेंद्रसिंहराजे यांनी पवारांकडे केली, तेव्हा रामराजे अजितदादा यांच्याशी आपण चर्चा केली आहे आहे का ? असेही पवार यांनी विचारले, मी या दोघांशीही बोललो आहे, असे उत्तर शिवेंद्रसिंहराजेंनी पवारांना दिले. माझ्या निवडीला अजितदादांचा हिरवा कंदील आहे, असे देखील शिवेंद्रसिंहराजेंनी सांगितले. त्यावर अजित आणि रामराजे यांच्याशी मी बोलून घेतो असे पवार यांनी शिवेंद्रसिंहराजे यांना स्पष्ट केले.दरम्यान, जिल्हा बँक निवडणुकीमध्ये कोरेगाव आणि माण तालुक्यातील सोसायटी मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा झालेला पराभव याची खंत देखील पवारांनी शिवेंद्रसिंहराजे न समोर बोलून दाखवली.६ डिसेंबरला अध्यक्षपदाची निवडजिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची निवड सोमवार दि. ६ रोजी होणार आहे. अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीमधून नितीन पाटील यांचे नाव अग्रभागी आहे. त्यांच्यानंतर सत्यजितसिंह पाटणकर, राजेंद्र राजपुरे यांची नावे देखील चर्चेत आहेत. या मंडळींनी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांकडे अध्यक्षपदाची मागणी केली आहे. तर आमदार शिवेंद्रसिंहराजे देखील पुन्हा अध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याने सहकार पॅनल च्या वतीने कोणता निर्णय घेतला जाणार याबाबत उत्सुकता आहे.सहकार पॅनलमध्ये मतभेद नाहीत : नितीन पाटीलजिल्हा बँकेत सलग तीन टर्म संचालक म्हणून काम करत असलेले नितीन पाटील यांनी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे जिल्हा बँकेचे अध्यक्षपद मिळावे, अशी मागणी केलेली आहे. सहकार पॅनलमध्ये कोणतेही राजकारण अथवा मतभेद नाहीत. संचालक निवडताना कोणतेही राजकारणाला झाले नाही तर चेअरमन पद निवडताना कसे येईल, तसेच सहकार पॅनेलचे नेते एकत्रित बसून अध्यक्षपदाची निवड करतील, असे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावर शिवेंद्रसिंहराजेंचा दावा, सिल्वर ओकवर घेतली शरद पवारांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2021 5:21 PM