सातारा: सातारा पालिकेमध्ये मर्जीतल्या ठेकेदारांना ठेका मिळावा म्हणून विकास कामे रखडवली. सध्या शाहूनगरात घाणीची साम्राज्य आहे. मात्र, प्रशासकाकडे बोट दाखविले जाते. प्रशासक आला लोकप्रतिनिधींची जबाबदारी संपली का? मग सातारा विकास आघाडीने रिटायरमेंट घ्यावी, अशी टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खासदार उदयनराजे भोसले यांचे नाव न घेता केली. शहरातील रिक्षा संघटनांच्या वतीने आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची भेट घेतली.
त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते पुढे म्हणाले, सातारकरांना सेवा सुविधा मिळतात की नाही हे पाहणे माजी नगरसेवकांचे काम आहे. सातारा विकास आघाडीचे नेते आणि नगरसेवक पालिकेत कुठेच दिसत नाहीत. नगराध्यक्षा कुठे आहेत, त्यांचे नेते काय करत आहेत. शाहूनगरात सफाई कामगारांचे टेंडर राजकीय हेतूने अडवण्यात आले आहेत. प्रत्येक वेळी निवडणुका आल्यानंतर मिठ्या मारणे, पप्पी घेणे अशी नौटंकी करायची. त्यावेळी सातारकर आठवतात का? असा टोला आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी लगावला.