सातारा : जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्ताने तालुक्यातील राजकारण बदलणार आहे. तालुक्यात दहशत माजविणाऱ्यांना पुरून उरू. विरोधक संघर्षाची भाषा वापरत आहे. तालुक्यात लक्ष घालणार असल्याचे ते सांगतात. मात्र, आम्ही घाबरत नाही, अशा शब्दांत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आमदार शशिकांत शिंदे यांना ललकारले आहे.
जिल्हा बँकेचे नूतन संचालक ज्ञानदेव रांजणे यांचा सत्कार सोहळा मेढा येथे घेण्यात आला होता. या सोहळ्यात शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, ज्ञानदेव रांजणे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवेंद्रसिंहराजे म्हणाले की, रांजणे यांची संघर्षातून संचालक म्हणून निवड झाली आहे. मतदारांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे. या सत्कार सोहळ्याचे तीन दिवसांपासून नियोजन सुरू होते. यासाठी गाणी रचली ती पुद्दुचेरीत रचली होती. त्यांना निवडून देणारे सर्व मतदार त्यांच्यासोबत ताकदीने राहिले. धमक्या दादागिरी दहशत यांना पुरून उरले. ठरावधारक ताकदीने शेवटपर्यंत राहिले. अनेक मतदारांवर दबाव आला ठरावधारकांना थांबविण्यासाठी त्यांच्या मुलांना नोकरीवरून गावी पाठवून दिले गेले. दादागिरीचे प्रकार निवडणुकांमध्ये झाले. लोकशाही पद्धतीने निवडणूक झाली असती, तर अजूनही जास्त मतांचा फरक पडला असता. जावलीत सुरू असलेल्या दडपशाहीच्या राजकारणाला रोखण्याचं काम जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने झाले आहे.
आ.शिंदे यांनी तालुक्यात आणखी लक्ष घालणार असल्याचं म्हटलं आहे, त्याबाबत बोलताना शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, तुम्ही उगीच लक्ष घालता, म्हणून हा प्रकार झाला. तुम्ही योग्य पद्धतीने वागला असता, तर एवढा संघर्ष टोकाला गेला नसता. आपल्या चुका आहेत की नाही, हे त्यांनी तपासावे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीमुळे तालुक्यातील वातावरण बदलले गेल्याचा अभिमान वाटतो आहे. त्यांनी काय चुका केल्या, ते त्यांनी पाहिलं पाहिजे. दुसऱ्याकडे बोट दाखविणं थांबवावे. कुणी कितीही लक्ष घालू दे, आमचंच त्यांच्यावर लक्ष आहे. त्यांना बोलणं सोपं वाटत असलं, तरी आमची पूर्ण तयारी आहे. आपली बाजू योग्य आहे. तालुक्याचा विकास व्हावा. वातावरण चांगलं असावे. तालुक्यात वेगळं वातावरण सुरू करण्याचं काम जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने झाले आहे.
फेविकलचा जोड एकसंगपणा ठेवला. ताकद देण्याचं काम केले. मनापासून आनंद आहे. सर्वसामान्य माणूस बँकेवर गेला. डोंगरी भाग राजकीय वलग नसताना विजय झाला आहे.
एकाच्या खांद्यावर हात ठेवून दुसऱ्याला डोळा मारण्याचा प्रकार विरोधकांनी थांबवावा. त्यांनी कार्यकर्त्यांना वापरून सोडून दिलं आहे. आता ज्या-ज्यावेळी प्रसंग येईल, तेव्हा निवडणुकांमध्ये असलं राजकारण हद्दपार करण्याचं काम आम्ही करू. जावली तालुक्यातून बँकेवर कोणी स्वत:ची पोळी भाजण्यासाठी जाणार नाही.- आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले