वाई : ‘कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे किरकोळ विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. ही दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल,’ असा इशारा ‘मनसे’तर्फे देण्यात आला आहे.
तहसीलदार रणजित भोसले यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वाई शहरासह तालुक्यात काही दुकाने ठराविक वेळेत सुरू आहेत. इतर प्रकारची दुकाने बंद आहेत. त्यांना कोणतेही उत्पन्नाचे साधन नसल्यामुळे बऱ्याच कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे.
गेल्या दीड वर्षापासून कोरोनाचे संकट असून, सततच्या लॉकडाऊनमुळे व्यावसायिकांची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. आर्थिक आवकही बंद होती. त्याचवेळी कौटुंबिक खर्च, कुटुंबाची जबाबदारी व उपजीविका, शैक्षणिक खर्च, शासनाचे विविध प्रकारचे टॅक्स, कर, वीजबिल, दुकानभाडे असे खर्च सुरुच होते. हे खर्च भागवताना प्रत्येकजण मेटाकुटीला आलेला आहे. व्यवसाय पूर्ववत झाल्यानंतर व्यवसायाची गाडी अद्यापही रुळावर आलेली नसतानाही शासनाचे व इतर सर्व कर भरून आर्थिक व इतर ओढाताण सहन करून व्यावसायिक कसाबसा संसाराचा गाडा चालवत आहेत. सर्वसामान्यांवर यामुळे मोठे आर्थिक संकट आले असून, त्यांच्या कुटुंबाची उपासमार होत असल्याने निर्बंध शिथील करावेत, अशी मागणी मनसेने केली आहे.
यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष मयूर नळ, वाई तालुकाध्यक्ष संजय गायकवाड, शहराध्यक्ष विश्वास सोनावणे, तालुकाध्यक्ष मयूर सणस, दीपक मांढरे, योगेश फाळके, भाऊ भडंगे, अजित शिंदे, कल्पेश वाघ, प्रवीण महांगडे, गौतम गायकवाड यांच्या सह्या आहेत.