दत्ता यादव ।सातारा : पती-पत्नीच्या नात्यामध्ये मिठाचा खडा म्हणून पडलेल्या मोबाईलमुळे वर्षभरात तब्बल १६० संसार तुटण्याच्या मार्गावर होते. मात्र, जिल्हा परिषदेतील समुपदेशन व मदत केंद्राने या सर्वांच्या संसाराचा गाडा पुन्हा सुरू केला, त्यामुळे सर्व दाम्पत्य भारावून गेली.
मोबाईलची क्रांती झाल्यानंतर जग जवळ आलं; पण ही मोबाईलची क्रांती अनेकांचे संसार उद्ध्वस्त करण्यालाही कारणीभूत ठरतेय. हे अलीकडे आपल्याला पाहायला मिळत आहे. जिल्हा परिषदेतील समुपदेशन व मदत केंद्रामध्ये गेल्या वर्षभरामध्ये १६० जोडपी समुपदेशनासाठी आली होती. यातील बहुतांश जोडप्यांच्या संसारामध्ये मोबाईलमुळे मिठाचा खडा पडल्याचे समोर आले आहे.
एकमेकांच्या मोबाईलमध्ये डोकावून पाहण्याची सवय आणि मोबाईलवर जास्त बोलत राहाणे, रात्री-अपरात्री मेसेज करणे, अशी कारणे दाम्पत्य समुपदेशक सुषमा मोरे यांच्याजवळ सांगत होते. संसार उद्ध्वस्त होण्यासाठी ठोस असं काही कारण नव्हतंच. केवळ संशयाचे भूत पती-पत्नीच्या डोक्यामध्ये असल्यामुळे बरेच संसार तुटण्याच्या मार्गावर होते. या जोडप्यांचे समुपदेशन सुषमा मोरे आणि विधी सल्लागार अॅड. स्मिता पवार यांनी केले. पाच ते सहा तास सलग जोडप्यांशी चर्चा करून त्यांचे संसार तुटण्यापासून त्यांनी परावृत्त केले. अशा प्रकारच्या केसमध्ये उच्च शिक्षितांचे प्रमाण लक्षणीय असल्याचे समुपदेशक सुषमा मोरे यांनी सांगितले.
काही जोडप्यांचे न्यायालयातही खटले सुरू होते. मात्र, या केंद्रामध्ये आल्यानंतर अनेक जोडप्यांनी आपले खटले काढून घेऊन गुण्यागोविंदाने राहण्याचे मान्य केले. भविष्याचा आणि मुलांचा विचार करून जोडप्यांचे समुपदेशन केले जाते, त्यामुळे बरीच जोडपी ताटातूट न होण्यासाठी सहमती दर्शवतात, असे समुपदेशक सुषमा मोरे यांनी सांगितले.
सर्वसमावेशक समुपदेशनया केंद्रात कौटुंबिकच बरोबरच मालमत्ताविषयक मार्गदर्शन, लैगिंक हिंसा, व्यसन मुक्ती, मानसोपचार यावरही समुपदेशन केले जात आहे. वर्षभरात येथे केवळ सल्ला घेण्यासाठी १३२ जण आले. मालमत्ता विषयक-१२, लैंगिक हिंसेच्या-७, तडजोडी-१५०, न्यायालयीन-५५, व्यसन मुक्ती केंद्र-११, पोलीस स्टेशन- १९, मानोसपचार तज्ज्ञ-६, इतर वैद्यकीय उपचार-२ अशा प्रकारची प्रकरणे निकाली काढली आहेत.