सातारा : दिवाळीच्या धांदलीमध्ये शॉफीमधून मोबाईल चोरून नेणाऱ्या युवकास शाहूपुरी पोलिसांच्या पथकाने सापळा रचून अटक केली.विशाल बिटू नागटिळक (वय ३३, रा. लक्ष्मीटेकडी, झोपडपट्टी, सातारा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संदेश भालेकर यांच्या मोबाईल शॉपीमधून काही महिन्यांपूर्वी १५ हजारांचा मोबाईल चोरीस गेला होता. त्यानंतर त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
पोलीस कॉन्स्टेबल हसन तडवी यांनी गोपनीय माहिती मिळवून तसेच तांत्रिक विश्लेषनाच्या आधारे विशाल नागटिळक याच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो पोलिसांना गुंगारा देत होता. दि. २३ रोजी अजंठा चौकाजवळ विशाल हा कामानिमित्त आल्याची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले.
या पथकाने अजंठा चौकात जाऊन सापळा लावला. विशाल नागटिळक त्या ठिकाणी येताच त्याला झडप घालून पोलिसांनी ताब्यात घेतले. मोबाईल चोरीचा गुन्हा त्याने कबुल केला असून, त्याच्याकडून चोरीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे.
त्याने आणखी कुठे अशाप्रकारे मोबाईलची चोरी केली आहे का, याबाबत पोलीस त्याच्याकडे कसून चौकशी करत आहेत. पोलीस उपनिरीक्षक डी.बी.भोसले, हसन तडवी, हिम्मत दबडे-पाटील, पोलीस नाईक लैलेश फडतरे, ओंकार यादव, मोहन पवार, पंकज मोहिते यांनी ही कारवाई केली.