सातारा : महिन्यापूर्वी साताऱ्यात तरुणाला हप्त्यासाठी भोसकणाऱ्या व शहरात दहशत पसरविणाऱ्या बकासूर गँगवर मोक्का लावण्यात आला आहे. महिन्याच्या आतच पोलिसांनी या टोळीवर कारवाई केली आहे. टोळीचा म्होरक्या यश नरेश जांभळे याच्यासह १७ जणांवर मोक्का लागला असून, यातील काहीजण हे अल्पवयीन आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळ्यांवर कठोर कारवाईबाबत सूचना केली आहे. त्याप्रमाणे अतिरिक्त पोलिस अधीक्षक बापू बांगर यांनी सातारा शहर परिसरातील टोळ्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना केली होती. बकासूर गँगवरही पोलिसांचे लक्ष होते. असे असतानाच दि. १६ नोव्हेंबर रोजी साताऱ्यातील प्रतापगंज पेठेत यश जांभळे व त्याच्या १६ साथीदारांनी आर्यन विशाल कडाळे याला हप्ता दिला नाही व तो डबल करण्यासाठी मारहाण केली. दिवसा प्रतापगंज पेठेत आर्यन कडाळेला भोसकण्यात आले. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात बकासूर गँगवर जिवे मारण्याच्या प्रयत्नासह इतर काही गुन्हे नोंद झाले.शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाल्यानंतर तपासात टोळीप्रमुख यश जांभळे याने बकासूर गँगची साताऱ्यात दहशत माजविण्यासाठी इतर गुन्हेगार टोळीतील सदस्यांनाही एकत्र केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिस निरीक्षक संजय पतंगे यांनी या टोळीविरोधात माहिती संकलित करून पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्यामार्फत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्याकडे मोक्का अंतर्गत प्रस्ताव पाठवला हाेता. या प्रस्तावास महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया यांनी मंजुरी दिली आहे. आता याचा तपास साताऱ्याचे पोलिस उपाधीक्षक यांच्याकडे असणार आहे.बकासूर गँगचा प्रमुख यश नरेश जांभळे (वय २०, रा. झेडपी काॅलनी, शाहूपुरी सातारा) याच्यासह टोळीतील सदस्य राहुल संपत बर्गे (वय १९, रा. वृंदावन काॅलनी, शाहूपुरी, सातारा), टेट्या उर्फ गाैरव अशोक भिसे (वय २०), ऋषिकेश उर्फ शुभम हणमंत साठे (वय २१, दोघेही रा. गुरुवार पेठ, सातारा), अनिकेत उदय माने (वय २०, शनिवार पेठ, सातारा), आदित्य सुधीर जाधव (वय १९, रा. भैरोबाचा पायथा, सातारा), शंतनू राजेंद्र पवार (वय २१, रा. आरफळ, ता. सातारा), अनिकेत सुभाष पारशी (रा. शनिवार पेठ, सातारा), पिन्या उर्फ सुनील माणिकराव शिरतोडे (रा. सातारारोड, ता. कोरेगाव) यांच्यासह एक अनोळखी आणि अल्पवयीन असणाऱ्या ७ अशाप्रकारे १७ जणांच्याविराेधात मोक्का कारवाई झालेली आहे.पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरक्त पोलिस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपाधीक्षक मोहन शिंदे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर, शाहूपुरीचे पोलिस निरीक्षक संजय पतंगे, सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत बधे, अभिजित यादव, हवालदार अमित सकपाळ, हसन तडवी, लैलेश फडतरे, अमित माने, स्वप्नील कुंभार, ओंकार यादव, मिथून मोरे, विजय कांबळे, अमृत वाघ, सतीश बाबर, सुनील भोसले, सचिन पवार, स्वप्नील सावंत, स्वप्नील पवार आदींनी मोक्का कारवाई होण्यासाठी सहभाग घेतला.
साताऱ्यातील मोकाट बकासूर टोळीला मोक्काने गिळले, यातील काहीजण अल्पवयीन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 3:39 PM