दत्ता यादव
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : पूर्वी लहान मुलांच्या हातामध्ये मोबाइल देताना पालक दहा वेळा विचार करीत होते. मात्र, आता या उलट परिस्थिती असून, मोबाइल हातात घेऊन अभ्यास करण्यासाठी पालक आता मुलांवर सक्ती करताना आपल्याला पाहावयास मिळतात. मात्र, याचे काही फायदे आहेत, तसेच तोटेही आहेत.
कोरोनाकाळामध्ये मुलांसाठी स्मार्टफोन त्यांचा शिक्षक बनला. या स्मार्टफोनमुळे मुलांना नवनवीन माहिती मिळू लागली. मुलांच्या हातामध्ये एक प्रकारे आधुनिक गॅझेट आल्यामुळे मुलांना अभ्यास करण्यासाठी वाव मिळाला. मात्र, या आधुनिक गॅझेटचा मुलांच्या मनावर परिणाम होऊन मुलांची पावले गुन्हेगारीकडे वळत असल्याचेही काही घटनांवरून दिसून येत आहे. गेल्या महिन्यामध्ये एका सातवीतील मुलाने अभ्यास करता करता एका मुलीला अश्लील एसएमएस पाठविला. हा मेसेज पाठवल्यानंतर त्या मुलीने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, नंतर त्या मुलाची इतकी मजल पुढे गेली की त्या मुलाने एका स्त्रीचा अश्लील फोटो त्या मुलीला पाठविला. या प्रकारानंतर संबंधित मुलीने तिच्या आई-वडिलांच्या कानावर ही गोष्ट घातली. तिच्या आई वडिलांनी तो फोटो आणि मेसेज पाहिल्यानंतर त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठले. त्यावेळी पोलिसांनी शहानिशा केल्यानंतर संबंधित मुलाच्या पालकांना आणि मुलाला पोलीस ठाण्यात बोलावले. मुलाच्या पालकांनाही जबर मानसिक धक्का बसला. आपल्या मुलाला आपण अभ्यासासाठी हा फोन दिला असताना त्याने या फोनचा गैरवापर करून भलतेच प्रकार केले, याचा पालकांना मनस्ताप झाला. सरतेशेवटी पोलिसांनी ही दोन्ही मुले अल्पवयीन असल्यामुळे त्यांच्या पालकांना आणि मुलांना समज देऊन सोडून दिले. अशाच प्रकारे आणखी एक घटना दोन महिन्यांपूर्वी साताऱ्यात घडली होती.
दहावीतील मुलाचे ऑनलाइन क्लासेस मोबाइलवर सुरू होते. मात्र, क्लास संपल्यानंतर तो आई-वडिलांची नजर चुकवून अधूनमधून अश्लील चित्रफिती पाहत होता. त्याला ही चित्रफीत पाहण्याची इतकी सवय लागली की, कधीकधी तो ऑनलाइन क्लासही अटेंड करायचा नाही. एकेदिवशी त्याने आपल्या वर्गातील एका ओळखीच्या मैत्रिणीला आय लव यू असा मेसेज पाठविला. संबंधित मुलीने त्याला प्रतिसाद न देता स्पष्ट नकार दिला. मात्र, त्यानंतरही त्याचे मेसेज पाठवणे सुरूच राहिले. अखेर या प्रकाराला कंटाळून तिनेही हा प्रकार तिच्या आई-वडिलांना सांगितला. मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात आल्यानंतर गुन्हा दाखल करण्याचा आग्रह पोलिसांना केला. त्यानंतर पोलिसांनी संबंधित मुलाला, मुलाच्या आईलाही पोलीस ठाण्यात बोलावले. इथेही पोलिसांनी समजूतदारपणा दाखवून आई-वडील व मुलांचे समुपदेशन केले. एकंदरीत मुलांच्या हातातील आधुनिक गॅझेट मुलांना कधीकधी वाममार्गाला तर लावत नाही ना असाही प्रश्न आता पालकांना पडू लागला आहे. लहान वयातच मुलांना बसल्याजागी इत्थंभूत माहिती मिळत आहे. त्यामुळे या आधुनिक बजेटचा मुलांनी कसा वापर करावा हे सर्वस्वी आता पालकांवर अवलंबून राहिले आहे.
चौकट : पालकांनी खबरदारी घेणे गरजेचे!
मुलगा अभ्यासाला बसल्यानंतर तो नेमका मोबाइलमध्ये काय करतोय, हे पालकांनी पाहणे गरजेचे आहे. मुले लहान असल्यामुळे वाईट गोष्टीचे ते पटकन अनुकरण करतात. त्यामुळे एखादी वाईट सवय मुलांना लागण्यापूर्वीच पालकांनी खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.